नाशिक : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्ष एकीकडे युती, आघाडीची चर्चा करीत असताना दुसरीकडे निवडणूक यंत्रणेने या निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी युद्धपातळीवर सुरू केली असून, मतदार याद्यांचे अद्यावतीकरण करण्याबरोबरच यंदा पहिल्यांदाच या निवडणुकीत व्हिव्हीपॅट यंत्राचा वापर करण्यात येणार असल्याने नाशिक जिल्ह्यासाठी ५४७९ नवीन मतदान यंत्रे देण्यात आली आहे. जिल्ह्याचे पथक यंत्रे घेण्यासाठी बैंगलोर येथे रवाना झाले आहे.देशपातळीवर लोकसभा व विधानसभा निवडणूका एकत्र घेण्याची चर्चा होत असताना त्यास निवडणूक आयोगाने प्रतिकूलता दर्शविली असली तरी, सध्याचे तापलेले राजकीय वातावरण पाहता, लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक राजस्थान, मध्यप्रदेश आदी राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या बरोबरीने घेण्याची शक्यताही वर्तविली जात आहे तसे झाल्यास डिसेंबर अखेर या निवडणूका होतात की काय असे वाटू लागल्याने निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तयारीला वेगाने सुरूवात केली आहे. त्यासाठी मतदार याद्यांचे अद्यावतीकरण करण्यात येत आहे. यादीत कृष्णधवल छायाचित्र असलेल्या मतदारांचे रंगीत छायाचित्र गोळा करण्यात आले आहे. शिवाय प्रत्येक मतदाराच्या घरोघरी जावून त्यांची संपुर्ण अद्यावत माहिती भ्रमणध्वनी क्रमांकासहीत गोळा करण्यात आली आहे. येत्या १ सप्टेंबर रोजी आयोगाकडून अद्यावत विधानसभा मतदार संघनिहाय मतदार यादी जाहीर करण्यात येणार आहे. या शिवाय वाढलेल्या नव मतदारांच्या प्रमाणात मतदान केंद्रांची पुर्नरचना करण्यात आली असून, नवीन मतदान केंद्रे तयार करण्यात येवून अशा केंद्रांवर मतदारांसाठी सोयी, सुविधा पुरविण्याच्या सुचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत.निवडणूक आयोगाकडून वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम यंत्रावर गेल्या काही निवडणूकांपासून राजकीय पक्षांकडून व विशेषत: विरोधी पक्षांकडून संशय व्यक्त केला जात असल्यामुळे आयोगाने आगामी निवडणुकीत व्हिव्हीपॅट यंत्राचा वापर करण्याते ठरविल्याने जुने ईव्हीएम यंत्रे आयोगाने आपल्या ताब्यात घेतले आहेत. नाशिक जिल्ह्यातील नाशिक, दिंडोरी व धुळे या तीन लोकसभा मतदार संघातील एकूण ४२२८ मतदान केंद्रांचा विचार करता निवडणूक आयोगाने आगामी लोकसभा निवडणुकीत सर्व राजकीय पक्ष व अपक्ष उमेदवारांच्या संभाव्य संख्येचा विचार करता दुपटीने म्हणजेच ९४२२ बॅलेट युनिट देण्याचे ठरविले असून, त्यासाठी ५४७९ कंट्रोल युनिट मंजूर करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील अधिका-यांचे पथक यंत्रे घेण्यासाठी बैंगलोरला रवाना झाले असून, ८ कंटेनरद्वारे प्रचंड पोलीस बंदोबस्तात येत्या एक, दोन दिवसात यंत्रे दाखल होतील.
नाशिक जिल्ह्यासाठी साडेपाच हजार नवीन ‘इव्हीएम’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2018 2:54 PM
देशपातळीवर लोकसभा व विधानसभा निवडणूका एकत्र घेण्याची चर्चा होत असताना त्यास निवडणूक आयोगाने प्रतिकूलता दर्शविली असली तरी, सध्याचे तापलेले राजकीय वातावरण पाहता, लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक राजस्थान, मध्यप्रदेश आदी राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या बरोबरीने घेण्याची शक्यताही वर्तविली
ठळक मुद्देलोकसभेची तयारी : पहिल्यांदाच होणार ‘व्हिव्हीपॅट’चा वापर जिल्ह्याचे पथक यंत्रे घेण्यासाठी बैंगलोर येथे रवाना