नाशिक : शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा कहर कायम आहे. शुक्रवारी (दि.८) दिवसभरात तब्बल ५१ नवीन कोरोनाबाधित आढळून आले. जिल्ह्यात कोरोनाचा धुमाकूळ कायम असल्याने बाधितांचा आकडा थेट ५७२ वर पोहोचला आहे.मालेगावात कोरोनाचा कहर सुरू असताना नाशिक शहरातदेखील शुक्रवारी (दि.८) तब्बल १८ नवीन बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे नाशिक शहरातील बाधितांचा आकडा थेट ४४ वर पोहोचला आहे. नाशिक शहरात सातपूर कॉलनी, सिडको, पाटीलनगर, हिरावाडी भागातील १३ रुग्ण बाधित असल्याचे आढळून आले. त्यात सात जणांना सातपूर कॉलनीतील एका पॉझिटिव्हच्या संपर्कात आल्याने लागण झाली आहे. शहरातील अन्य पाच बाधित नाशिकच्या धात्रकफाटा, इंदिरानगर, तारवालानगर, कोणार्कनगर भागातील आहेत. शुक्रवारी दिवसभरात मालेगावसह ग्रामीण नाशिकमध्ये ३३ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडल्याने ही संख्या ५१ वर पोहोचली. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांचा आकडा थेट ५७२ वर गेला आहे. जिल्ह्यात प्रथमच दिंडोरी तालुक्यातही कोरोनाने शिरकाव केला असून, दिंडोरीनजीकच्या गावातील ग्रामस्थदेखील बाधित आढळून आला आहे.चांदवड तालुक्यातील एक बाधित यापूर्वी पॉझिटिव्ह आढळून आलेल्या रुग्णाचा नातेवाईक आहे. तर मालेगाव येथे कोरोनामुक्तीसाठी आरोग्य यंत्रणांच्या प्रयत्नांना यश येत आहे. २६ एप्रिल ते ७ मे या १२ दिवसांच्या कालावधीत ४५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. केवळ हीच बाब यंत्रणेच्या दृष्टीने काहीशी दिलासादायक ठरत आहे.
जिल्ह्यात ५१ नवे कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2020 11:33 PM