नाशिक : नाशिक पोलीस आयुक्तालयातर्फे १२ दिवसांपूर्वीच मुख्यालयात पोलिसांकरिता स्वतंत्र कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. या केंद्रात सध्या ५१ रुग्णांवर महापालिकेचेवैद्यकीय पथक उपचार करत आहे. केंद्रात एकूण ३६ पोलिसांसह त्यांच्या नातेवाइकांचा समावेश आहे. यामध्ये १४ महिला रुग्ण आहेत.
पोलिसांसाठी अद्यावत कोविड केअर सेंटरची नितांत आवश्यकता होती. पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी याबाबत गांभीर्याने लक्ष घालून पोलिसांसाठी स्वतंत्र अद्यावत सेंटर अस्तित्वात आणल्याने शहर पोलीस दलाला मोठा आधार मिळाला असून कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबीयांनाही उपचाराची व्यवस्था झाली आहे. पोलीस मुख्यालयातील भिष्मराज सभागृहात पुरुष कर्मचाऱ्यांसाठी ८0 खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच याच हॉलमध्ये महिला कर्मचाºयांसाठी ४0 खाटांची स्वतंत्र व्यवस्था केली आहे. नाशिक महानगर पालिकेच्या सहकार्याने पोलीस कोविड केअर सेंटर कार्यान्वित करण्यात आले आहे. येथे वैद्यकीय अधिकारी, परिचारिका तथा वॉर्ड बॉय यांचे एक स्वतंत्र पथक आहे. वैद्यकीय पथकासाठी निवासाची स्वतंत्र व्यवस्था आहे. केंद्राचे काम सुरळीत चालण्यासाठी समिती गठीत करण्यात आली असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.सेंटरची स्वतंत्र रुग्णवाहिका सेवानाशिक मोटार परिवहन विभागाकडून दोन वाहने रुग्णवाहिका म्हणून उपलब्ध करून दिली आहेत. पोलीस कोविड केअर सेंटरच्या विशेष सेलमध्ये प्राप्त ‘कॉल’वरुन रुग्णवाहिका त्वरित रवाना होतात.