शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत कोरोनाच्या काळात चोख बंदोबस्तावर हजर राहून नाकाबंदी, फिक्स पॉईंटवर कर्तव्य बजावूनदेखील मागील दोन महिन्यांपासून होमगार्डच्या पदरात मानधनाची रक्कम पडलेली नाही. मात्र, ही व्यथा सांगू कुणाकडे? अशीच काहीशी अवस्था सध्या होमगार्डची झाली आहे.
शहरातील भद्रकाली, अंबड, सातपूर, पंचवटी, आडगाव, म्हसरूळ, इंदिरानगर, सरकारवाडा, गंगापूर, नाशिक रोड, मुंबई नाका, उपनगर, देवळाली कॅम्प अशा सर्वच पोलीस ठाण्यांच्या हद्दीत बंदोबस्तासाठी मागील चार महिन्यांपासून होमगार्ड पोलिसांच्या मदतीला रस्त्यावर उभे आहेत.
आगामी गणेशोत्सव दोन महिन्यांवर येऊन ठेपला आहे. पोलिसांप्रमाणेच होमगार्डवरसुद्धा बंदोबस्ताचा अतिरिक्त ताण असताना त्यांना मानधनाच्या रकमेपासून वंचित ठेवले जात असल्याने प्रशासकीय व्यवस्थेविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
नाशिक शहरातील सर्वच पोलीस ठाण्यात पोलिसांच्या बंदोबस्तासाठी सुमारे चारशे होमगार्ड मदतीला घेण्यात आले आहे परंतु जानेवारीचे ३१दिवस, एप्रिलचे दहा दिवस, आणि मे महिन्याचे अकरा दिवस असे एकूण ५२ दिवस कोरोना महामारी काळात जीवाची पर्वा न करता पोलिसांच्या बरोबरीने नाकाबंदी, गस्तीवर कर्तव्य बजावूनसुद्धा अद्याप मानधनाची रक्कम चारशे होमगार्डच्या पदरात पडलेली नाही हे विशेष!
--इन्फो--
चारशे होमगार्डचे मानधन एक कोटीच्या घरात
बंदोबस्तासाठी हजर असलेल्या होमगार्डला प्रत्येकी एक दिवसाचे ६७० रुपये याप्रमाणे मानधन दिले जाते. याप्रमाणे एका होमगार्डचे ३४ हजार ८५० रुपये थकले आहेत तर एकूण चारशे होमगार्डचे मिळून १ कोटी ३९ लाख २० हजार रुपये इतकी रक्कम थकली आहे.