नाशिक : शेअर बाजारात गुंतवणूक करून अवाच्या सव्वा दराने आकर्षक परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून अकरा संशयितांनी एका सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट कंपनीच्या मालकाला तब्बल ५२ लाख १० हजार रुपयांना गंडा घातल्याची घटना सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि. ३०) दाखल झालेल्या गुन्ह्यातून समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित अविनाश सूर्यवंशी, वैभव ननावरे, साईनाथ त्रिपाठी, अमोल शेजवळ, शाहरूख देशमुख, जयेश वाणी, सिद्धार्थ मोकळ, आशुतोष सूर्यवंशी, ईशा जयस्वाल, सचिन जयस्वाल व हितेश पवार यांनी कॉलेज रोड भागात यशोमंदिर ॲव्हेन्यू येथे कार्यालय सुरू केले होते. त्यांनी २५ फेब्रुवारी ते २०२२ ते २२ डिसेंबर २०२२ या नऊ महिन्यांच्या कालावधीत एका सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट कंपनीचे मालक असलेल्या संतोष इंद्रभान गोरे (३५, रा. अशोकामार्ग) यांना शेअर बाजारातील कंपनीत गुंतवणूक करण्याचे, तसेच आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून ५२ लाख १० हजार रुपयांच्या रकमेची गुंतवणूक करण्यास भाग पाडले.
मात्र, संशयितांनी आश्वासन दिल्याप्रमाणे संतोष गोरे यांना कोणताही परतावा न देता त्यांची फसवणूक केली. त्याचप्रमाणे संशयित त्यांचे कार्यालयही बंद करून ते पळून गेले. त्यामुळे संतोष गोरे यांनी सरकारवाडा पोलिस ठाण्यात सर्व अकरा संशयितांविरोधात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, सहायक पोलिस उपनिरीक्षक कोल्हे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.