नाशिक : शहर परिसरात घरफोड्यांचे सत्र सुरूच असून, अद्याप दहावी-बारावीच्या परीक्षादेखील संपल्या नसून उन्हाळी सुटीलाही सुरुवात झाली नाही. मात्र आतापासूनच घरफोड्यांच्या टोळ्या विविध भागांत सक्रिय झाल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत. रविवार पेठसारख्या गजबजलेल्या ठिकाणी एका बंद घराचे कुलूप चोरट्यांनी संध्याकाळच्या सुमारास तोडून सुमारे दोन लाख ७२ हजारांचे दागिने लंपास केल्याचे उघडकीस आले आहे.सरकारवाडा पोलीस ठाणे हद्द असलेल्या रविवार पेठ भागातील वैभव अनिल नवले यांच्या मालकीचे खरे सदनच्या दहा क्रमांकाच्या बंद खोलीचे कुलूप घरफोड्यांच्या टोळीने संध्याकाळी पावणे पाच वाजेच्या सुमारास तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाटात ठेवलेले १४ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने यामध्ये मंगळसूत्र, सोनसाखळी, अंगठी, कानातल्या रिंग्स, डोरले, मुरणी, वेढा यांसह आदि दागिन्यांचा समावेश आहे. दोन लाख ७२ हजार रुपये किमतीचे दागिने चोरी झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी नवले यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांनी घटनास्थळी धाव घेतली. घराची पाहणी करून चोरट्यांचा माग काढण्यासाठी पोलिसांनी तत्काळ श्वान पथकाला पाचारण केले. यावेळी पोलिसांनी पंचनामा करून चोरट्यांविरु द्ध गुन्हा नोंदविला आहे. श्वानाने घराचा वास घेत परिसरातील गल्ली- बोळातून थेट मुख्य रस्त्यापर्यंत चोरट्यांचा माग दाखविला. याप्रकरणी अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक गोसावी करीत आहेत. (प्रतिनिधी)
दोन महिन्यांत ५४ घरफोड्या
By admin | Published: March 11, 2017 1:45 AM