नाशिक : कोरोनाच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी देशभरात सुरू असलेल्या कोरोना लसीकरण अभियानात दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा लसीकरण सुरू झाले सून नाशिक जिल्ह्यातील वेगवेगळ्या १३ लसीकरण केंद्रांवर मंगळवारी दिवसभरात ७१० आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेतली. परंतु अभियानाच्या पहिल्या दिवसांप्रमाणेच दुसऱ्या दिवशीही लस टोचून घेण्यात आरोग्य कर्मचाऱ्यांची उदासीनता दिसून आली. जिल्ह्यातील ५९० कर्मचाऱ्यांनी वेगवेगळे कारण देत लस घेण्यास नकार दिला. त्यामुळे जिल्हाभरात अभियानाच्या दुसऱ्या दिवशीही केवळ ५५ टक्केच लसीकरण होऊ शकले.
संपूर्ण देशभरासह नाशिक जिल्ह्यातही १६ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणास सुरुवात झाली आहे. लसीकरणाच्या पहिल्या दिवशी नोंदणी केलेल्या तेराशेपैकी जिल्हाभरातून केवळ ७४५ आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस टोचून घेतल्यानंतर अभियानाच्या दुसऱ्या दिवशी लस घेणाऱ्यांच्या संख्येत आणखीनच घट झाल्याचे दिसून आले. शासनाच्या लसीकरणाच्या प्रणालीत तांत्रिक अडचणी आल्याने मागील दोन दिवस लसीकरण स्थगित करण्यात आले होते. ते मंगळवार (दि.१९)पासून पुन्हा सुरू करण्यात आल्यानंतर दिवसभरात ७१० आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेतली, तर ५९० कर्मचाऱ्यांनी लस घेण्यास नकार दिला, यात १७ गरोदर माता, १९ स्तनदा माता, २१ जणांनी ॲलर्जीच्या भीतीने व ४० कर्मचाऱ्यांनी विविध आजारांचे कारण देत लस घेण्यास नकार दिला. तर ४९३ कर्मचाऱ्यांनी लसीकरणास उपस्थित राहण्याचे टाळून लस घेण्यास नाकार दिल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.
इन्फो
शाब्बास निफाड ..
कोरोनाचे लसीकरण ऐच्छिक असल्याने जिल्हाभरातील अनेक आरोग्य कर्मचारी वेगवेगळे कारण देत लसीकरणास नकार देत आहेत. परंतु, निफाड तालुक्यातील कर्मचाऱ्यांनी कोरोनाच्या संकटाचे गांभीर्य लक्षात घेऊन उत्स्फूर्तपणे लसीकरणास हजेरी लावली. त्यामुळे निफाडमध्ये अभियानाच्या दुसऱ्या दिवशी शंभर टक्के लसीकरणाची नोंद झाली.
इन्फो-
लसीकरण तक्ता
रुग्णालय - लक्ष्य - ध्येयप्राप्ती
नाशिक जिल्हा रुग्णालय - १०० -६९
मालेगाव शासकीय रुग्णालय - १०० -४८
कळवण उपजिल्हा रुग्णालय - १०० -४०
निफाड उपजिल्हा रुग्णालय - १०० -१०५
चांदवड उपजिल्हा रुग्णालय -१०० -१००
येवला उपजिल्हा रुग्णालय -१०० -६१
इंदिरा गांधी मनपा रुग्णालय - १०० -४५
नवीन बिटको मनपा रुग्णालय - १०० -५२
जेडीसी बिटको मनपा रुग्णालय -१०० - ३७
मालेगाव कॅम्प वॉर्ड रुग्णालय - १०० - ४३
मालेगाव निमा रुग्णालय - १०० - २६
मालेगाव रमजानपुरा रुग्णालय -१०० -२४
सोयगाव मालेगाव मनपा रुग्णालय -१०० - ६०
एकूण १३ रुग्णालये १३०० ७१०