नाशिक : पोलिस कारवाईनंतर मध्यवर्ती कारागृहातून सुटल्यानंतरही शहरात गुंडगिरी करीत दहशत माजविणाऱ्या सराईत चोरट्यांसह रेकाॅर्डवरील गुन्हेगार व टवाळखोरांना संबंधित पोलिस ठाण्यात नियमित हजेरी द्यावी लागणार आहे. पाेलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी यासंदर्भात कारवाई करण्याचे आदेश पोलिस ठाण्यांना दिले असून, गुन्हेगारांची हजेरी प्रक्रिया सुरू झाली असून नाशिक शहरातील विविध १३ पोलिस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रातील तब्बल ५५२ सराईत गुन्हेगारांना आता संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये नियमित हजेरी लावावी लागणार आहे.
त्यासोबत संबंधित पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी अशा गुन्हेगारांच्या हालचालींवरही करडी नजर ठेवणार असल्याचे मध्यवर्ती गुन्हे शाखेतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
नाशिक शहर पोलिस आयुक्त शिंदे यांनी गुन्हेशाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव, परिमंडळ एकचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण, परिमंडळ दाेनचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांच्यासह सर्वच पाेलिस ठाण्यांच्या वरिष्ठ निरीक्षकांना कारवाईचे, त्यांच्या भागातील सराईत गुन्हेगारांवर लक्ष ठेवून गुन्हेगारी नियंत्रित करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार मध्यवर्ती कारागृहातून जामिनावर सुटलेले अथवा पॅरोलवर सुटलेल्या गुन्हेगारांवर पोलिसांची करडी नजर असून, अशा गुन्हेगारांच्या संशयास्पद हालचालींवर पोलिस नजर ठेवून आहेत.
यात विविध गंभीर गुन्ह्यांत तुरुंगातून तात्पुरत्या स्वरूपात जामिनावर असणाऱ्या सराइतांसह बाँडवरील हिस्ट्रीशिटर, रेकाॅर्डवरील चाेरटे व अन्य सराइतांना त्यांच्या हद्दीतील पाेलिस ठाण्यात हजेरी लावणे बंधनकारक केले असून, गुन्हेगारी टवाळखोरी प्रवृत्तीच्या सराइतांच्या वर्तनात सुधारणा व्हावी, त्यांनी गुन्हेगारीचा मार्ग सोडावा यासाठी पोलिसांकडून अशा प्रकारे प्रयत्न केले जात असून, या माध्यमातून शहरातील गुन्हेगारीही नियंत्रित आणण्याचा पोलिसांचा प्रयत्न असल्याचे सांगितले जात आहे.