सिन्नर : यावर्षी तालुक्यात अल्प पर्जन्यमानामुळे ऐन हिवाळ्यातच पाणी टंचाईच्या झळा नागरिकांना सोसाव्या लागत आहेत. तालुक्यातील अनेक वाड्या-वस्त्यांवर तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्याने टॅँकरची मागणी वाढू लागली आहे. परिणामी दीड महिन्याच्या कालावधीत दोन गावे व १०० वाड्या-वस्त्यांची भर वाढल्याने टॅँकरच्या फेºयांमध्ये तिपटीने वाढ करण्यात आली आहे. सध्या तालुक्यात १३ गावे व १५३ वाड्या-वस्त्यांना दररोज ३० टॅँकरद्वारे ७५ खेपांद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. तसेच पाणी पुरवठ्यासाठी ३ विहीरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत.तालुक्यात यावर्षी पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षाही अल्प राहिल्याने सर्वत्रच दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. संपुर्ण पावसाळ्यात तालुक्यात ५० टक्क्यांपेक्षाही कमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे शासनाने सिन्नर तालुका दुष्काळी जाहीर केला आहे. तालुका दुष्काळी जाहीर झाला असला तरी दुष्काळ निवारणासाठी आवश्यक उपाययोजनांची जनतेला अद्याप प्रतिक्षा आहे. पिण्याचे पाणी व जनावरांच्या चाºयाचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत चालेला आहे. तालुक्याच्या पूर्वभागात सर्वाधिक गावांना पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत आहे. सर्वच जलस्रोत ठणठणीत कोरडे पडल्याने विहिरींमध्ये थेंबभरही पाणी राहिले नाही. पाण्याचा शोध सुरु असून त्यासाठी ठिकठिकाणी कुपनलिका, विहिरी खोदण्याचे काम करुनही पाणीच मिळत नसल्याने बळीराजा हताश झाला आहे. ‘विहिरीत नाही तर पोहोºयात कोठून येणार’ अशी अनुभूती तालुक्यातील शेतकºयांना येत आहे. पिण्याच्या पाण्यावर मात करण्यासाठी तालुका पंचायत समिती प्रशासाने योग्य नियोजन केल्याने तालुक्याच्या ग्रामीण भागातील वाड्या-वस्त्यांपर्यंत टँकर पोहोचू शकले. या टँकरच्या मागणीतही रोज भर पडते आहे. तालुक्यातील १२६ गावांपैकी तब्बल १३ गावांची व १५३ वाड्या वस्त्यांची तहान टँकरवर भागविली जात आहे.