नाशिक - भिकाजय सिंग यांचा सहा महिन्यांचा चिमुकला श्रीरीश हा सोमवारी (दि.११) सकाळी पावणेअकरा वाजेच्या सुमारास झोपेतून अचानक जागा झाला. त्याचे आई-वडील झोपले होते. स्वयंपाकासाठी पाणी भरून ठेवलेल्या गॅसजवळील बादलीजवळ तो रांगत गेला. खेळतांना त्याने बादलीच्या आधाराने उभे राहण्याचा प्रयत्न केला असता दुर्दैवाने तोल गेल्याने या चिमुकल्याचे शिर पाण्यात बुडाले. नाकातोंडात बादलीतील पाणी गेल्यामुळे त्याचा श्वास गुदमरला.
सिंग दाम्पत्याला ज्यावेळी जाग आली तेव्हा बाळ निपचित पडले असल्याचे त्यांना दिसून आले. त्यांनी घाबरलेल्या अवस्थेत बाळाला घेऊन जिल्हा शासकीय रुग्णालय गाठले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बाळाची तपासणी केली असता त्याचा मृत्यू झाल्याचे त्यांनी घोषित केले. बाळाच्या अंताचे वृत्त ऐकताच मातेने जिल्हा रुग्णालयात हंबरडा फोडला. नानाच्या मळा परिसरातील रहिवाशांनी त्यांच्या घरी धाव घेत दाम्पत्याला आधार दिला. दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सातपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हवालदार मारुती भड करीत आहेत.