नाशिक सायक्लिस्टस फाउंडेशनचे सदस्य असलेल्या ६२ ते ७४ वयोगटातील ६ ज्येष्ठ नागरिकांनी बुधवारी (दि. २२) श्रीराम वनगमन मार्गावरून सायकलवरून जाण्यासाठी मार्गस्थ झाले. तब्बल दोन महिन्यांच्या कालावधीत ते अयोध्या ते श्रीलंकेतील कोलंबोपर्यंत असा ६ हजार किलोमीटरचा सायकलप्रवास करणार आहेत.
या ज्येष्ठ सायकलपटूंमध्ये मुकुंद ओक (७४), श्रीराम पवार (६९), रमेश धोत्रे (६५), डॉ. साहेबराव कासव (६५), ले. कर्नल (रिटायर्ड) शिवनारायण मिश्रा (६३), सुभेदार उल्हास कुलकर्णी (६२) असे हे सहा सायकलवीर तरुण पिढीला प्रेरणा देण्यास निघणार आहेत. अयोध्या ते श्रीलंका या मार्गाने आरोग्य व स्वच्छ पर्यावरण हा संदेश घेऊन सायकलने ६ हजार किलोमीटर प्रवासास निघालेले आहेत. या सायकलपटूंचा प्रवासाचा मार्ग सहा राज्यातून जाणार आहे.
त्यात उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, सर्वप्रथम अयोध्या, प्रयागराज, चित्रकूटच्या सती अनुसया आश्रम, मैहर देवीचे स्थान, लवकुश जन्मस्थान आणि ऋषी वाल्मिकी आश्रम असलेला शिवरीनारायण, चित्तूर, भद्राचलम, रामायणातील किष्किंधा नगरी अर्थात हम्पी, सहस्त्रलिंग, चित्रदुर्गा, रामेश्वरम, तंजावूर व शेवटी नागपट्टणम् येथून जहाजाद्वारे समुद्र पार करणार आहेत.
तिथून श्रीलंकेतील जाफना भागातील कांकेसेन तुरई येथे पोहोचणार आहेत. श्रीलंकेत साधारणपणे २० दिवस सायकलनेच रामायणात उल्लेखित महत्त्वाच्या स्थानांना भेट देणार आहेत. त्यात प्रामुख्याने प्रभू रामचंद्र रामसेतूने जेथे पोहोचले होते, त्या मन्नार, अनुराधा पुरा, रावणाचा महाल, नुवारा एलिया आणि कोलंबो अशा स्थानांना भेट देणार आहेत.