नाशिक- शहरात सिमेंटच्या वाढत्या जंगलात पशुपक्षी राहाणे कठीणच. परंतु तरीही पक्ष्यांचा किलबिलाट वाढून नैसर्गिक समतोल साधला जावा यासाठी पंचवटीतील परशुराम पुरीया पार्कमध्ये आता तब्बल ६५ फूट उंचीचे पक्षीघर साकारण्याचा महापालिकेचा प्रस्ताव आहे. दाणापाण्याची सोय आणि राहण्यासाठी रेडिमेड घरटी यामुळे याठिकाणी पक्ष्यांचा किलबिलाट पुन्हा वाढणार आहे.
नाशिक महापालिकेच्यावतीने प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून लवकरच त्यासाठी निविदा मागवण्यात येणार आहे.
वाढत्या शहरीकरणामुळे वृक्षतोड होत गेली आणि सिमेंटचे जंगल वाढत गेले. घरट्यांसाठी झाडेच नसल्याने पक्ष्यांचा अधिवासच संपुष्टात येत आहे. नाशिक महापालिकेची सुमारे चारशे लहान मोठी उद्याने आहेत. मात्र, बहुतांश उद्यानांचा एकसारखा पॅटर्न असून झाडांपेक्षा लॉन्स, खेळण्या आणि ग्रीन जिम्स या पलिकडे वेगळेपणच नाही. पंचवटीतील परशुराम पुरीया पार्क हे पंचवटी कारंजानजीक आणि निमाणी बसस्थानकाच्या दरम्यान असून चहुबाजूने वर्दळ आहे. त्यामुळे उद्यान तसे नावालाच आहे. परंतु आता याच ठिकाणी पक्ष्यांचा किलबिलाट वाढवण्याचे नियोजन आहे.
गुजरातमध्ये पक्षीघर कल्पना रुजली असून म्हैसणे तालुक्यातील प्रत्येक गावात पक्षीघर आहे. साठ-पासष्ट फुटाचे हे पक्षी घर अत्यंत उंच आहे. जमिनीपासूनचा बेस दहा ते बारा फुट असतो आणि त्यावर दाणापाणी ठेवले जाते. त्यामुळे त्याठिकाणी श्वान पोहोचू शकणार नाहीत. त्यावर मात्र मनोऱ्याप्रमाणे पक्षी घर असते. मोरबी येथे तर अशाप्रकारे रेडिमेड घरे मिळतात. मात्र ते आणून ॲसेंम्बल करावी लागतात. नाशिक महापालिकेने त्या प्रकल्पाचा अभ्यास करून पक्षीघर साकारण्याची तयारी केली असून त्यामुळे सुमारे चार हजार पक्षी या परीसरात दिसू शकतील, असे या प्रभागाचे नगरसेवक गुरूमित बग्गा यांनी सांगितले. लोकांच्या मदतीने या पक्षीघराची देखभाल करण्याची देखील व्यवस्था करण्यात येणार आहे. या कामासाठी खर्च जेमतेम आठ ते नऊ लाख असून त्यासाठी नगरसेवक निधीतून तरतूद करण्यात आली आहे. नाशिकमध्ये प्रथमच अशाप्रकारचा प्रयोग राबविण्यात येणार आहे.
इन्फो..
असे आहे नियोजित पक्षीघर...
- बारा फूट बेस
- त्यावर ४८ फूट उंच पक्षीघर
- मनोऱ्यात ८०० घरे
- एका घरात पाच पक्षी राहतील असा अंदाज
- चार हजार पक्षांचा अंदाज
कोट...
हा प्रकल्प राबवून कायमस्वरूपी पक्ष्यांचा किलबिलाट कायमस्वरूपी राहावा यासाठी स्थानिक नागरिक आणि व्यावसायिकांची मदत अपेक्षित आहेत. वर्षभर खाद्य आणि नियमित पाण्याची व्यवस्था देण्यासाठी त्यांची मदत घेतली जाणार आहे.
- गुरूमित बग्गा, नगरसेवक
===Photopath===
060321\06nsk_39_06032021_13.jpg
===Caption===
पक्षी घर (संग्रहीत)