नाशिक : दहावीची परीक्षा रद्द करण्यात आल्यानंतर नव्या मूल्यमापन पद्धतीद्वारे निकाल जाहीर होणार असून, अकरावी व तत्सम प्रवेशासाठी विद्यार्थी व पालकांना आता निकालाची प्रतीक्षा लागली आहे. नाशिक शहरात अकरावीच्या प्रवेशासाठी २५ हजार २७० जागा उपलब्ध असून, या जागांसाठी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही अकरावी प्रवेशासाठी सीईटीच्या आधारे ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. दरम्यान, अकरावीत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी सीईटीसाठी अभ्यासालाही सुरुवात केली आहे.
अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे जूनअखेरपर्यंत दहावीचा निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. तसेच अकरावी प्रवेशाबाबतही महत्त्वाचा निर्णय घेत प्रवेशासाठी संपूर्ण राज्यामध्ये आता एक सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) घेतली जाणार आहे. त्यानुसार शहरातील विविध कनिष्ठ महाविद्यालयांत अकरावीची ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया राबविली जाणार असून, कला, वाणिज्य, विज्ञान व संयुक्त शाखा यांच्या मिळून २५ हजार २७० हजार जागा उपलब्ध आहेत. त्यामुळे दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अकरावीसाठी सीईटी परीक्षा होऊन जुलै व ऑगस्ट महिन्यात प्रत्यक्ष प्रवेशप्रक्रिया होण्याची शक्यता आहे.
अकरावीची सीईटी परीक्षा राज्य मंडळाच्या दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. प्रवेशप्रक्रियेत सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळावी म्हणून सीईटी परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षेचे स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे राहील. १०० गुणांच्या परीक्षेसाठी दोन तासांचा कालावधी देण्यात येणार आहे. सीईटी परीक्षा विद्यार्थ्यांना ऐच्छिक असेल. मात्र, प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्राधान्यक्रमाने प्रवेश दिला जाणार आहे. त्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांवर इतर विद्यार्थ्यांना दहावीच्या गुणांच्या आधारावर प्रवेश दिला जाणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करताना या अभ्यासक्रमाचा फायदा होणार आहे.
इन्फो -
शहरात विज्ञान शाखेच्या सर्वाधिक जागा
नाशिक महानगरपालिका क्षेत्रात जवळपास ६० कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये २५ हजार २७० जागांसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. यात विज्ञान शाखेच्या सर्वाधिक १० हजार १६० जागांचा समावेश असून, त्याखालोखाल वाणिज्य शाखेच्या ८ हजार ६००, कला शाखेच्या ४ हजार ९१० व एमसीव्हीसीच्या १३६० जागांचा समावेश आहे.
पॉईंटर
शाखानिहाय उपलब्ध जागा
कला - ४,९१०
वाणिज्य- ८,६००
विज्ञान - १०,१६०
एमसीव्हीसी -१,३६०
गतवर्षी असे झाले प्रवेश
प्रवेशासाठी नोंदणी - ३२,१३३
अर्ज निश्चित - २६,९०२
पडताळणी पूर्ण -२६,८९१
पर्याय भरणारे विद्यार्थी -१८,९२६
शहरातील महाविद्यालये - ६०
उपलब्ध जागा - २५,२७०
प्रवेशित विद्यार्थी - १९,७१२
रिक्त जागा - ५,५५८