पंचवटी : आडगाव शिवारातील नववा मैल परिसरात रस्त्यावर संशयास्पद उभ्या असलेल्या एका पांढऱ्या रंगाच्या इनोव्हा कारमध्ये तब्बल ६० किलो बेवारस गांजा आढळून आला आहे. आडगाव पोलिसांनी घटनास्थळावरून सहा लाख रुपये किमतीचा गांजासह सात लाख रुपयांची कार असा एकूण सुमारे १३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी आडगाव पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरुद्ध अंमली पदार्थ कायदा कलम अनव्ये गुन्हा दाखल केला आहे. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली. सदर गांजा कुठून आणला व कोणाला पुरविला जात होता याबाबत पोलिस शोध घेत आहेत.
शुक्रवारी पहाटेच्या सुमाराला आडगाव पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकातील कर्मचारी भास्कर वाढवणे, विजय सूर्यवंशी, दशरथ पागी, दिनकर भुसारे आदी कर्मचारी दहावा मैल परिसरात गस्त घालत असताना नववा मैलजवळ एक पांढऱ्या रंगाची इनोव्हा कार पार्किंग लाइट सुरू करून उभी असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी गाडी जवळ जाऊन पाहिले असता गाडीत दोन गोण्यांमध्ये काहीतरी संशयास्पद वस्तू दिसून आल्या. त्यानंतर सदर माहिती रात्र गस्तीवर असलेल्या पोलीस निरीक्षक अशोक साखरे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस उपनिरीक्षक हेमलता उबाळे यांना कळविण्यात आली. पोलिस ताफा घटनास्थळी दाखल झाला. गाडीचा दरवाजा उघडला असता मागील सीटवर दोन गोण्या आढळून आल्या. त्या उघडून बघितल्या असता त्यात गांजा असल्याचे निष्पन्न झाले.
इन्फो बॉक्स
पोलिसांना पाहून पलायन
मध्यरात्रीच्या सुमाराला आडगाव पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकातील कर्मचारी दहावा मैल परिसरात गस्त घालत असताना गांजा वाहतूक करणाऱ्या संशयितांनी लांबून येणारे पोलीस वाहन बघितले. त्यानंतर गाडीमध्ये गांजाचे पोते तसेच ठेवून गाडी सोडून पलायन केले. सदर गाडी मालेगावच्या दिशेने जात असल्याने संशयित मालेगाव भागातील असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आडगाव परिसरात पहिल्यांदाच एवढा गांजा आढळून आल्याने काही वर्षांपूर्वी एका राजकीय पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्याचा गांजा जप्त केला होता त्यामुळे सदर गांजा माल नेमका कोणाचा याबाबत पोलिस शोध घेत आहेत.