लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : महानगरपालिका निवडणुकीसाठी आज, बुधवारी ५९.५२ टक्के मतदान झाले. उद्या, शुक्रवारी मतमोजणी होणार असून, उमेदवारांसह शहरवासीयांचे निकालाकडे लक्ष लागून आहे. पूर्व भागात कॉँग्रेस-राष्ट्रवादी, काँग्रेस-एमआयएमच्या तसेच पश्चिम भागात शिवसेना-भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीचा प्रकार व नांदेडी शाळेतील मतदान केंद्रावर काही काळ निर्माण झालेली तणावाची परिस्थिती वगळता मतदान प्रक्रिया शांततेत व उत्साहात पार पडली. कॅम्प भागातील एका मतदान केंद्रावर सायंकाळी उशिरापर्यंत मतदान सुरू होते. रिंगणातील ३७३ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. रात्री उशिरा पोलीस बंदोबस्तात मतदान यंत्रे स्ट्रॉँग रूममध्ये ठेवण्यात आली. शहराच्या पूर्व भागात मतदारांनी मतदानासाठी सकाळपानच रांगा लावल्या होत्या. दुपारी उन्हाच्या तीव्रतेमुळे मतदारांची संख्या घटली होती. मात्र दुपारनंतर मतदार घराबाहेर पडल्याने पुन्हा मतदान केंद्रांवर मतदानासाठी मतदारांनी गर्दी केली. यात महिला वर्गाचा उत्साह अधिक दिसून येत होता. मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाने चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता तर वृद्ध व दिव्यांगांसाठी महापालिकेने खास वाहनांची व्यवस्था केल्याने त्यांची मोठी सोय झाली. दरम्यान, पश्चिम भागात मोसमपूल परिसरात राज्यमंत्री दादा भुसे यांचे पुत्र अविष्कार भुसे व नगरसेवक सुनील गायकवाड यांचे पुत्र दिपक गायकवाड यांच्या समर्थकांमध्ये हाणामारीचा प्रकार घडला. यामुळे धावपळ उडाली होती तर विद्यमान नगरसेवक सखाराम घोडके व नरेंद्र सोनवणे यांच्या समर्थकांमध्येही हाणामारीचा प्रकार घडला. सोनवणे यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती. दरम्यान, या हाणामारीचे प्रकार वगळता मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडली.