मालेगाव : शासनाच्या नवीन पुंज धोरणानुसार नविन कंटेन्मेंट झोनची निर्मिती करण्यात आली असून, पूर्वीच्या ११९ कंटेन्मेंट झोनऐवजी आता मालेगाव शहरात नवीन समाविष्ट व समायोजित असे ४५ कंटेन्मेंट झोन तयार करण्यात आलेले आहेत आणि इतर झोन डी-कंटेन्मेंट करण्यात आलेले आहे. नवीन डिस्चार्ज धोरणानुसार आजपावेतो ६00 च्या जवळपास रुग्ण उपचार घेऊन घरी गेले आहेत, तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण मोठ्या संख्येने वाढलेले आहे. अशी माहिती मनपा आयुक्य दीपक कासार यांनी पत्रकारांना दिली. नवीन रुग्णांची संख्याही लक्षणीयरीत्या कमी झाली असून, चालू सप्ताहात खूपच कमी प्रमाणात नवीन रुग्ण सापडले. त्यामुळे डी-कंटेन्मेंट झोन जास्त प्रमाणात करण्यात येत आहेत जेणेकरून शहरात जास्तीत जास्त पॉवरलूम चालू करता येणार आहे आणि लोकांना रोजगार उपलब्ध करता येईल, असे सांगून आयुक्त कासार म्हणाले, जे पॉवरलूम कंटेन्मेंट झोनमध्ये नाहीत अशा पॉवरलूम व कारखानेधारकांना त्यांचे पॉवरलूम तेथील कामगारांचा वापर करून चालू करण्यास हरकत नाही. तसेच कंटेन्मेंट झोनमधील कामगारांना डी-कंटेन्मेंट झोनमध्ये जाऊन काम करण्यास परवानगी नाही, परंतु जर अशा कामागारांची राहण्याची व इतर सुविधा संबंधित कारखानदार व लूम मालक यांनी केल्यास काही हरकत नाही. शहर विकासासाठी लूम चालू होणे ह्या गोष्टी आवश्यक आहे, परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठी दक्षता घेणे गरजेचे आहे.सामान्य रुग्णालयाचे डॉ. हितेश महाले यांनी सांगितले की, खोकला आला आणि दम लागला म्हणजे कोरोना आहे असे नाही, स्वॅब तपासणी ही शेवटची चाचणी असली तरी प्राथमिक चाचणीसाठी मनपाने हज हाउस व केबीएच येथे डिजिटल एक्स- रे टेस्टची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. प्राथमिक तपासणीचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.-----------------------------धान्यापासून कोणीही वंचित राहणार नाहीनागरिकांमध्ये आजही प्रबोधनाची गरज लक्षात घेऊन प्रशासनाकडून मराठी व उर्दू माध्यमात जवळपास दोन अडीच लाख पत्रके छपाई करुन आम्ही गल्लोगल्ली वाटणार असल्याचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी सांगितले. अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम म्हणाले, अन्न सुरक्षा कायद्यानुसार कोणीही धान्यापासून वंचित राहणार नाही तसेच ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही त्यांनाही आधार कार्डची पडताळणी करुन जवळील रेशन दुकानातून प्रतिमाणसी ५ किलो धान्य देण्यात येणार आहे.
मालेगावचे ६00 बाधित ठणठणीत बरे होऊन घरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 10:05 PM