संदीप भालेराव, नाशिक: आदिवासी विकास विभागातील अपर आयुक्त नाशिक, ठाणे, अमरावती, नागपूर यांच्या आस्थापनेवरील विविध संवर्गातील सुमारे ६०२ पदांच्या सरळ सेवा भरतीची प्रक्रिया सुरू झाली असून ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्यात येत आहेत. येत्या ३ डिसेंबरपर्यंत उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरता येणार आहे.
आदिवासी विकास विभागांतर्गत सरळ सेवा भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून गट ‘ब’ आणि गट ‘क’ संवर्गातील विविध पदांच्या ६०३ जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. आदिवासी विकास विभाग यांच्या अधिपत्याखाली तसेच नियुक्त प्राधिकारी अपर आयुक्त नाशिक, ठाणे, अमरावती, नागपूर यांच्या आस्थापनेसाठी थेट भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक, वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक, संशोधन सहायक, उलेखापाल, मुख्य लिपिक, वरिष्ठ लिपिक, सांख्यिकी सहायक, लघू टंकलेखक, गृहपाल, अधिक्षक, प्रयोगशाळा सहायक, प्राथमिक शिक्षक सेवक, माध्यमिक शिक्षक सेवक, उच्च माध्यमिक शिक्षक सेवक, इंग्रजी माध्यमिक शिक्षक सेवक आदी पदांसाठी भरती केली जात आहे.
अगाेदरच शिक्षक सेवक आणि गृहपाल यांना कायम करण्याचा प्रश्न असताना आदिवासी विभागाने मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या पदांसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरावा लागणार आहे. पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करून त्यांची थेट नियुक्ती केली जाणार असल्याने ही संधी घेण्यासाठी विक्रमी अर्ज दाखल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी दुपारनंतर ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया मंदावली होती. दुपारनंतर अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला असून मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल होतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.