कळवण : कळवण तालुक्यातील अभोणा, कनाशी, ओतूर, पाळे, सप्तश्रृंगी गड, नांदुरी, भुसणी, गोसरानेसह २९ ग्रामपंचायतीच्या २६१ जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी ६०७ उमेदवारी अर्ज दाखल झाले.अभोणा, कनाशी, सप्तश्रृंगी गड, ओतूर, नांदुरी येथे चुरशीच्या लढती गेल्या अनेक निवडणुकीपासून होत असून, सन २००० पासून पाळे बु. ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यात स्थानिक नेत्यांना यश मिळते. यंदा बिनविरोधची परंपरा कायम ठेवून पाळे बु. ग्रामस्थ हे इतिहास करतात की, निवडणूक घेऊन बिनविरोधची परंपरा खंडित करतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.पाळे बु.च्या ३ प्रभागातील ९ जागांसाठी १७ उमेदवारी अर्ज दाखल झाल्यामुळे बिनविरोध परंपरा कायम ठेवण्यासाठी स्थानिक नेत्याचा कस लागणार आहे. अभोणा, सप्तश्रृंगी गड, नांदुरी, भुसणी व ओतूर येथे चुरशीच्या लढतीसाठी खास रणनीती आखली गेली. त्यात एका स्वयंभू नेत्याने आजी माजी आमदारांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून, मी तुमचाच आणि आपला पॅनल होतो, असे सांगून मदतीची याचना केली. त्यामुळे हा नेता नेमकी कोणाचा, असा प्रश्न स्थानिक ग्रामस्थ एकमेकांना विचारत असल्यामुळे हा सध्या चर्चेचा विषय झाला आहे.कळवण पंचायत समितीचे उपसभापती विजय शिरसाठ यांची कनाशी ग्रामपंचायतमध्ये प्रतिष्ठा पणाला लागणार असून, माजी आमदार जे. पी. गावीत हे कनाशीत शिरसाठ विरोधकांना रसद पुरविणार असल्यामुळे या ग्रामपंचायतच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागणार असून, विकास या मुद्द्यावर ग्रामपंचायत निवडणुकाना स्थानिक नेते व कार्यकर्ते सामोरे जाणार असल्यामुळे चुरशी लढती लक्षवेधी ठरणार आहे. बिनविरोध निवडणूक होऊ न देता, विरोधाला विरोध म्हणून उमेदवार उभे करण्याची रणनीती कळवण तालुक्यात राबविली गेली आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्यास नेतेमंडळीने कंबर कसले. यासाठी खास यंत्रणा कार्यन्वित करण्यात येऊन काही शिक्षकांना प्राचारण करण्यात आले.
२९ ग्रामपंचायतच्या ९४ प्रभागांत २६१निवडून द्यावयाच्या जागासाठी आजच्या अखेरच्या दिवशी ६,०७८ इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले. २९ ग्रामपंचायतसाठी ४२,८७१ मतदार आपला हक्क बजावणार असून, त्यात पुरुष मतदार २२,००१ असून, स्त्री मतदार २०,८७० असून, ९६ मतदान केंद्रात मतदानाचा हक्क बजावणार आहे.कळवण शहरात राहणारे नगरपंचायतला मतदार असणारे कळवण शहरालगत व तालुक्यात गावी राहणारे २९ ग्रामपंचायत निवडणुकीतही मतदार असून, मतदानाचा हक्क बजावणार आहे, अशा मतदारावर निवडणूक यंत्रणा कारवाई करणार का? असा सवाल इच्छुक उमेदवारांनी केला आहे.