नाशिक : नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या ६१ सायकलिस्टने एक वर्षात १० हजार किमी सायकलिंग चॅलेंज पूर्ण करून अनोखा विक्रम केला आहे. १ ऑगस्ट २०२० ते ३१ जुलै २०२१ या कोरोनाकाळात १० हजार किलोमीटर स्टार सायकलिंग व्हर्च्युअल चॅलेंज हे आव्हान या सायकलस्वारांनी पार केले.
मिशन फाॅर हेल्थ या उपक्रमांतर्गत सायकलिस्टने मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. शासनाचे सर्व निर्बंध पाळून सायकलिंग करण्याचे आव्हान सर्वांना देण्यात आले. स्ट्राव्हा या ॲपद्वारे जी काही सायकलिंग करतील त्याची किलोमीटरमध्ये नोंद ठेवण्यात आली. या ॲपद्वारे नाशिक सायकलिस्ट्स क्लबला १९६८ सायकलप्रेमी जॉईन झाले व जवळजवळ १००० सायकलिस्टने हे आव्हान उस्फूर्तपणे स्वीकारले. सर्व मेंबर्स मिळून पूर्ण वर्षभरात ३२ लाख कि.मी. सायकलिंगची विक्रमी नोंद झाली. विशेष म्हणजे स्वतःचे आरोग्य व पर्यावरणाच्या दृष्टीने नाशिक शहरामध्ये एक मोठे पाऊल नाशिक सायकलिस्ट्स फाउंडेशनच्या वतीने राबविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिभा चौधरी व माधुरी गडाख यांनी तर आभारप्रदर्शन साधना दुसाने यांनी केले.
सायकलपटूंमध्ये ७ महिलांचा समावेश
जिल्ह्यातील ६१ सायकलिस्टमध्ये ७ महिलांनीदेखील दहा हजार किमीचे लक्ष्य गाठले. निर्धारित अंतर पूर्ण करणाऱ्या सायकलिस्टचा सन्मान सोहळा छोटेखानी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने पार पडला. सायकलप्रेमी किरण चव्हाण, रॅम विजेते डॉ. हितेंद्र महाजन, लायन्स क्लब ऑफ कार्पोरेटचे अध्यक्ष विनय बिरारी, नाशिक सायकलिस्ट्सचे संस्थापक अध्यक्ष विशाल उगले , माजी अध्यक्ष प्रवीण खाबिया, वैष्णवी डिस्ट्रीब्यूटरचे मुकेश ओबेराॅय यांच्या प्रमुख उपस्थितीत स्टार सायकलिस्टला विशेष सन्मानचिन्ह व आकर्षक मेडल प्रदान करण्यात आले. यावेळी नाशिक सायकलिस्ट्सचे अध्यक्ष राजेंद्र वानखेडे यांनी व्हिडिओ प्रेझेंटेशनद्वारे सायकलिंगसह राबविण्यात आलेल्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आदिवासी भागातील खेळाडू मुलींना दहा नवीन सायकली भेट देण्यात आल्या. यासाठी विशेष सहकार्य भूषण खैरनार व दिनेश जोशी यांचे लाभले.