कळमनुरी : येथील पोलिस ठाणे हद्दीत ७६ गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली होती. त्यात ५४ गावात ‘एक गाव, एक गणपती’ बसविण्यात आले. ८ सप्टेंबर रोजी सर्वच गणेश मूर्तीचे विसर्जन शांततेत करण्यात आले. पोलिस ठाणेहद्दीत ६१ गावांत पोलिस बंदोबस्ताविना गणेश विसर्जन करण्यात आले. काही गावांनी गणेश विसर्जनाला पोलिस बंदोबस्त पाठवू नका, असे पोलिस ठाण्याला लेखी कळविले होते. या गावात महात्मा गांधी तंटामुक्त समित्यांच्या पुढाकाराने पोलीस बंदोबस्ताविना गणेश विसर्जन पार पडले. पोनि रविकांत सोनवणे यांनी तंटामुक्त अध्यक्ष व पोलिस पाटलांची बैठक घेऊन गणेश विसर्जन शांततेत साजरे करण्याचे आवाहन केले होते. गणेश मंडळांनी अनेक समाजोपयोगी शिबिरे घेतली. जातीय व धार्मिक सलोखा निर्माण करून तंटे निर्माण होऊ नये, ते उद्भवले तरी ते सामंजस्याने मिटविणे हा महात्मा गांधी तंटामुक्त समित्यांचा उद्देश आहे. पोळा सणानंतर गणेश उत्सवही पोलीस बंदोबस्ताविना तंटामुक्त समित्यांनी साजरा केला. तंटामुक्त झालेल्या गावात पुन्हा तंटामुक्तीत सातत्य रहावे, यासाठी समित्या पुढाकार घेत आहेत. गाव पातळीवर तंटे निर्माण होऊ नये, तंट्याची तडजोड गावातच व्हावी, गावात जातीय, धार्मिक सलोखा सामाजिक राजकीय सामंजस्य तसेच सुरक्षिततेची भावना निर्माण करणे, गावात शांतता रहाव आदी उदात्त हेतूने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम राबविल्या जात आहे. प्रत्येक गावात तंटामुक्तीत सातत्य रहावे, यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे पोनि रविकांत सोनवणे यांनी सांगितले.कनेरगावनाका : कनेरगावनाका येथील नटराज गणेश मंडळ, संगमेश्वर गणेश मंडळ तसेच गावातील छोटे, मोठे व घरगुती गणेश मंडळाचे सोमवारी रात्री ९ वाजेपर्यंत पैनगंगा नदीमध्ये शांततेत विसर्जन करण्यात आले.या परिसरातील वांझोळा, कानडखेडा खुर्द, कानरखेडा बु., पिंपरी वायचाळ येथील गणेश मंडळांच्या सर्व कार्यकर्त्यांनी गणेश विसर्जन केले. गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस पडत असल्याने पैनगंगा नदी दुथडी भरून वाहत होती. याच पैनगंगेत सर्व गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. यावेळी पोलिस प्रशासनाकडून बंदोबस्त करण्यात आला. येथील चौकीचे जमादार शाम खुळे, ग्रामसुरक्षा दलाचे लखन जयस्वाल, सलमान, होमगार्ड भारत राऊत, तंटामुक्तीचे अध्यक्ष रामचंद्र गावंडे, सरपंच डॉ. संतोष गावंडे यांनी गणेश मंडळांसोबत राहून शांततेत गणेश विसर्जन केले.कनेरगावनाका ग्रामपंचायतंतर्गत असलेल्या मोप येथील राजे शिवाजी गणेश मंडळाच्या वतीने टाळ मृदंग व हरिभजन करीत संपूणणर्् गावामधून गणरायांची मिरवणूक काढून शांततेत लाडक्या गणरायाला निरोप देण्यात आला. नागरिक, महिला व लहान मुलांचा समावेश होता. गणेश मंडळाचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.शेवाळा : कळमनुरी तालुक्यातील शेवाळा येथे सोमवारी बाप्पांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. शेवाळा गावात शांततेत मिरवणूक काढण्यात आली. दिंडी भजनात मिरवणूक रंगली होती. दरवर्षीप्रमाणे शांततेत मिरवणूक पार पडली. यंदाच्या वर्षी गुलालाऐवजी फुलांचा वर्षाव करण्यात आला. भजन दिंडीच्या मृदंग, टाळ या ताल धारणाऱ्या तरूणाईच्या जल्लोषाने परिसर दुमदुमला होता. गणेश विसर्जन मिरवणुकीत शिवनेरी सार्वजनिक गणेश मंडळाचे अध्यक्ष तुषार सूर्यवंशी, उपाध्यक्ष जीवन शिंदे यांच्यासह ग्रामस्थांनी सहभाग घेतला होता. कयाधू नदीमध्ये गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. यावेळी अक्षय सावंत, विलास सावंत, राजू सावंत, विठ्ठल सावंत, साहेबराव सूर्यवंशी, दत्तराव सावंत, संदीप सावंत आदींची उपस्थिती होती. कुरूंदा : कुरूंदा पोलिस ठाण्यांतर्गत ५४ गावांमध्ये शांततेत गणेश विसर्जन पार पडले. ३० गावात ‘एक गाव एक गणपती’ उपक्रम राबविण्यात आला. यावर्षी प्रथमच डीजे ऐवजी ढोलताशांच्या गजराज शांततेत मिरवणूक काढून गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप देण्यात आला. कुरूंदा, गिरगाव, शिरड शहापूर येथे रात्री उशिरापर्यंत गणेश मंडळाच्या मिरवणुका सुरू होत्या. कुरूंदा येथे रात्री १ वाजता शेवटच्या गणेश विसर्जन पार पडला. यावेळी कुरूंदा पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला होता.संतुक पिंपरी : हिंगोली तालुक्यातील संतुक पिंपरी येथे एक गाव एक गणपती’ चे विसर्जन करण्यात आले. जय भवानी गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी शांततेत मिरवणूक काढून गणेश विसर्जन केले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष नवनाथ मुकाडे, नामदेव पुरी, विष्णू पुरी,महेंद्र पुरी, किशोर ढगे, बबन मुकाडे, अविनाश पुरी यांच्यासह भजनी मंडळाच्या महिला व पुरूष बालगोपाल उपस्थित होते. (प्रतिनिधी)
६१ गावांत पोलिस बंदोबस्ताविना गणेश विसर्जन
By admin | Published: September 10, 2014 11:55 PM