नाशिकरोड : एकलहरे ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीसाठी मंगळवारी ६३ टक्के मतदान शांततेत पार पडले. मतमोजणी बुधवारी सकाळी १० वाजता नाशिक तहसील कार्यालयात होणार आहे. एकलहरे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पहिल्यांदाच सरपंचाची थेट जनतेतून निवड होणार आहे. तसेच ६ वॉर्डात १७ जागांसाठी निवडणूक झाली. एकलहरे कॉलनी येथील माध्यमिक विद्यालयात ७ व एकलहरे गावातील जिल्हा परिषद शाळा २ मतदान खोल्यांवर मंगळवारी सकाळी साडेसात वाजता मतदानप्रक्रिया सुरू झाली. सकाळपासून दुपारपर्यंत मतदानासाठी मतदारांनी मतदान खोल्यांवर रांगा लावल्याचे चित्र सर्वत्र दिसत होते. मतदान केंद्राबाहेर दोन्ही पॅनलचे उमेदवार मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करत होते. सायंकाळी मतदानाची वेळ संपेपर्यंत ७४६८ मतदारांपैकी ४७२० मतदारांनी (६३.१९ टक्के) मतदानाचा हक्क बजविला. विद्यमान सरपंच राजाराम धनवटे व जिल्हा परिषद सदस्य शंकर धनवटे यांचे ग्रामविकास पॅनल व नगरसेवक विशाल संगमनेरे यांचे भाजपाप्रणित परिवर्तन विकास पॅनलमध्ये सरळ लढत होत आहे. मतदानप्रसंगी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मतमोजणी बुधवारी सकाळी १० वाजता तहसील कार्यालयात होणार असून, निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून भाऊसाहेब जगताप काम पाहत आहे.
एकलहरे ग्रामपंचायतीसाठी ६३ टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 11:29 PM