नाशिक : जिल्ह्यात बळी गेलेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे अर्थातच ६० वर्षांपासून पुढील वयोगटातील होते. तसेच आतापर्यंत बळी गेलेल्या रुग्णांपैकी ६३ टक्के रुग्णांना पूर्वीपासूनच कोणते ना कोणते आजार, व्याधी लागलेल्या होत्या. त्यामुळे बळी गेलेल्यांमध्ये कोमॉर्बिड रुग्णांचेच बळी अधिक प्रमाणात गेल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यात पोर्टलवर बळी अपडेट करण्यापूर्वीच्या पाच हजार बळींपर्यंतच्या नोंदीमध्ये साठ वर्षांवरील बळींची संख्या सुमारे निम्मी होती. त्यामुळे अपडेटेड बळींमध्येही तोच निकष कायम राहिल्यास उर्वरित निम्मे बळी हे साठ वर्षांखालील वयोगटातील असल्याचे दिसून येते. ज्येष्ठ नागरिकांना कोणते ना कोणते आजार असणे साहजिकच असते. मात्र, चाळीस वर्षांवरील आणि साठ वर्षांखालील वयोगटातील २ हजारांहून अधिक बळींमध्येदेखील कोमॉर्बिड रुग्णांचाच भरणा अधिक असल्याचे दिसून येते. त्या वयोगटातदेखील निरोगी असूनही रुग्ण दगावल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. मात्र, टक्केवारीत ते प्रमाण एक चतुर्थांशपेक्षाही कमी भरते, तर निरोगी असूनही बळी गेलेल्यांमध्ये सर्वाधिक बळी हे चाळीस वर्षांखालील वयोगटातील आहेत. ज्या कुटुंबातील साठ वर्षांखालील व्यक्ती कोरोनाने दगावल्या, त्यांच्यावर तर जणू दु:खाचा डोंगरच कोसळला आहे.
इन्फो
बळींमध्ये मधुमेहींचे प्रमाण अधिक
आतापर्यंत बळी गेलेल्या नागरिकांमध्ये जे कोमॉर्बिड रुग्ण आहेत, त्यात एकाचवेळी विविध आजारांनी ग्रस्त रुग्णांची संख्या अधिक आहे. त्यातही प्रामुख्याने मधुमेह, रक्तदाब असे दोन्ही विकार असणाऱ्यांची संख्याच कोमॉर्बिड बळींमध्ये सुमारे एक तृतीयांश आहे. त्याशिवाय किडनी विकारग्रस्त, हृदयरोग, फुप्फुसाचा आजार, टीबी, मूळव्याध, पोटाचे विकार यासारख्या विविध आजारांनी ग्रस्त नागरिकांचे प्रमाणदेखील मोठे आहे. मात्र, मधुमेह या एकाच आजाराने ग्रस्त असतानाही कोरोना होऊन निधन झालेल्या नागरिकांचे प्रमाणच त्यात सर्वाधिक आढळून आले आहे.
इन्फो
पुरुषांच्या तुलनेत महिलांचे मृत्यू निम्मे
कोरोनामुळे बळी गेलेल्या रुग्णांमध्ये आतापर्यंत सर्वाधिक बळी हे कामधंद्यानिमित्त किंवा अन्य कोणत्याही कारणाने घराबाहेर पडावे लागणाऱ्या पुरुषांचेच आहे. महिलांमध्येदेखील नोकरी, कामधंदा करणाऱ्या महिलांचे प्रमाण अधिक आहे. मात्र, आतापर्यंत गेलेल्या एकूण बळींच्या एकूण संख्येपैकी पुरुषांच्या बळींच्या तुलनेत महिलांच्या मृत्यूंची संख्या निम्मीच आहे.
----------------
ही डमी आहे.