नाशिक : वक्तृत्व कलेचे जनक महर्षी व्यास यांनी ज्ञानदानाचे महत्त्व पटवून दिल्याने आपण ज्ञानदानाच्या जागेस व्यासपीठ, असे संबोधतो. भगवान श्रीकृष्णांनीदेखील अर्जुनाच्या रथाचे सारथ्य करताना त्यास आपल्या वक्तृत्वातून दिशादर्शन केले. वाणी आणि विचारांचे महत्त्व त्यांनी पटवून दिल्यामुळे आपल्या भारतातील ६४ कलांमध्ये वक्तृत्व कलेला महत्त्वाचे स्थान असल्याचे प्रतिपादन मविप्र संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांनी केले.रावसाहेब थोरात सभागृहात तेराव्या ‘मविप्र करंडक’ अखिल भारतीय वक्तृृत्व स्पर्धेचे उद्घाटन सोमवारी (दि. २१) झाले त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी संस्थेचे सभापती माणिकराव बोरस्ते यांच्यासह चिटणीस डॉ. सुनील ढिकले, संचालक नाना महाले, भाऊसाहेब खातळे, डॉ. प्रशांत देवरे, प्रल्हाद गडाख, सचिन पिंगळे, प्रा. नानासाहेब दाते, गुलाब भामरे, शिक्षणाधिकारी डॉ. डी. डी. काजळे, डॉ. एन. एस. पाटील, प्रा. एस. के. शिंदे, सी. डी. शिंदे आदी उपस्थित होते. या स्पर्धेमध्ये वक्त्याला जेवढे महत्त्व आहे तेवढेच श्रोत्यालाही असल्याचे नीलिमा पवार यांनी नमूद केले. तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा व वक्तृृत्व कलेतही त्यांनी प्रगती करावी, या दृष्टिकोनातून डॉ. वसंत पवार यांनी मविप्र करंडक स्पर्धेची मुहूर्तमेढ रोवल्याचे माणिकराव बोरस्ते यांनी अध्यक्षीय मनोगतात व्यक्त करताना सांगितले. प्रास्ताविक स्पर्धाप्रमुख डॉ. डी. पी. पवार यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. तुषार पाटील यांनी केले. उपप्राचार्य डॉ. एम. बी. मत्सागर यांनी आभार मानले.मविप्र करंडकचे विषयमविप्र करंडक वक्तृत्व स्पर्धेसाठी ‘कृत्रिम बुद्धिमत्ता : नवी दिशा’, ‘महात्मा गांधी : जागतिक परिप्रेक्ष्य’, ‘चला जलचिंतन करूया’, ‘जगावं की मरावं, हाच प्रश्न आहे’, ‘कहते है कि गालिब का अंदाज-ए-बयाँ और है!’ हे विषय आहेत. या विषयांवर राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरून स्पर्धेत सहभागी झालेले १५० स्पर्धक आपले विचार व्यक्त करणार आहेत.
६४ कलेत वक्तृत्व कला महत्त्वाची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 1:47 AM