लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : महापालिकेने गोदावरी नदी संवर्धनांतर्गत सुरक्षा आणि स्वच्छता या दोन स्तरांवर काम करण्याचा निर्णय घेतला असून, गोदाघाटाच्या स्वच्छतेसाठी आरोग्य विभागाने आयुक्तांच्या आदेशान्वये ६५ सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे दोन सत्रात गोदाघाट परिसराची स्वच्छता होणार आहे. महापालिकेने गोदावरी नदीपात्राबरोबरच आता गोदाघाट परिसराच्याही स्वच्छतेकडे लक्ष केंद्रित केले आहे. त्यानुसार, आरोग्य विभागाने नियोजन केले असून, घाट परिसराच्या स्वच्छतेसाठी ६५ सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्याबाबतचे आदेशही संबंधित कर्मचाऱ्यांना काढले असून, बुधवारी (दि.२१) ४७ कर्मचारी कामावर रुजूही झाले आहेत. सदर सफाई कर्मचाऱ्यांमार्फत होळकर पूल ते टाळकुटेश्वर पुलापर्यंत दोन पाळ्यांमध्ये सफाईची कामे करून घेतली जाणार आहेत. गोदावरी नदीच्या दोन्ही तीरावरील पन्नास मीटरपर्यंतच्या परिसराच्या स्वच्छतेवर भर दिला जाणार आहे. याशिवाय, ४ मुकादम आणि ४ स्वच्छता निरीक्षकांचीही नियुक्ती करण्यात आलेली आहे. सफाई कर्मचाऱ्यांना त्यांचे कार्यक्षेत्र निश्चित करून दिले जाणार आहे. दोन पाळ्यांमध्ये कर्मचारी नियुक्त केल्याने घाट परिसरात कायमस्वरूपी स्वच्छता राहण्यास मदत होणार आहे. तसेच गोदाघाटावर कायमस्वरूपी स्वतंत्र घंटागाडीची व्यवस्था उपलब्ध करून देण्याबाबतही गोदावरी संवर्धन कक्षाने आरोग्य विभागाला कळविले आहे. त्यामुळे, घाटावरील ब्लॅकस्पॉटवरील कचरा तातडीने उचलणे सोपे जाणार आहे. स्वच्छतेबरोबरच महापालिकेने नदीपात्रात घाण-कचरा टाकू नये यासाठी सद्यस्थितीत ५० सुरक्षारक्षक नियुक्त केले आहेत. आतापर्यंत २८ जणांवर घाण-कचरा टाकल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. कक्षाने आणखी ५० सुरक्षारक्षकांची मागणी केली असून, जिल्हा सुरक्षा मंडळाकडून सुरक्षारक्षक प्राप्त झाल्यानंतर किमान दोन फिरती पथकेही तैनात केली जाणार आहेत. या पथकांसोबत महापालिकेचाही एक कर्मचारी नियुक्त केला जाणार असल्याची माहिती उपआयुक्त रोहिदास दोरकुळकर यांनी दिली.
गोदाघाट स्वच्छतेसाठी ६५ सफाई कामगार
By admin | Published: June 22, 2017 12:05 AM