नाशिक : सार्वजनिक वितरण प्रणालींतर्गत गोरगरिबांना शिधापत्रिकेवर देण्यात येणारे धान्य, घासलेटच्या अनुदानात हळूहळू कपात करून शासनाने आता खुल्या बाजारभावाप्रमाणे जीवनावश्यक वस्तू विक्रीचा उद्योग सुरू केला असून, त्यातूनच सोमवारी नाशिक तालुक्यातील रेशन दुकानदारांची पुरवठा खात्याने बैठक घेऊन त्यात रेशन दुकानदारांनी ६५ रुपये प्रति लिटर या दराने फ्री सेलचे घासलेट तसेच पाच किलो वजनाचे सिलिंडर साडेतीनशे रुपयांना विक्रीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले आहे. राज्य शासनाने घासलेटचा वापर कमी करण्यासाठी हवे त्याला गॅस जोडणी देण्याचा निर्णय घेतला असून, त्यालाच आधार म्हणून आता ज्यांच्याकडे गॅस नाही, परंतु त्यांना शिधापत्रिकेवर घासलेट दरमहा दिले जाते अशा ग्राहकांचेही घासलेट हळूहळू कमी करण्यास सुरुवात केली आहे. खुल्या बाजारात घासलेटचे दर ६२ रुपये असून, तेच घासलेट रेशन दुकानदारांमार्फत विक्री करण्याचे ठरविले आहे. ज्या ग्राहकांना घासलेटची गरज आहे त्यांनी ते खरेदी करावे तर दुसरीकडे ज्यांना लहान गॅस सिलिंडर हवे असेल तेदेखील विक्रीसाठी खुले केले आहे. पाच किलो वजनाचे गॅस सिलिंडर रेशन दुकानदारांना उपलब्ध करून दिले जाणार असून, त्यांनी ते साडेतीनशे रुपयांना विक्री करायचे आहे, त्यात त्यांना प्रति सिलिंडरमागे ४० रुपये कमिशन दिले आहे. सोमवारी दुपारी झालेल्या बैठकीत जिल्हा पुरवठा अधिकारी कासार यांनी रेशन दुकानदारांना त्यासाठी आग्रह धरला असता दुकानदारांनी त्यास कडाडून विरोध केला. रेशनमधूनच जर शिधापत्रिकाधारकांना पुरेसे घासलेट उपलब्ध करून दिले तर फ्री सेलच्या वाढीव दराने घासलेट विक्रीची गरज भासणार नसल्याचे त्यांनी सांगितले, तसेच खुल्या बाजारात डिझेल ६० रुपये प्रतिलिटर मिळत असताना ६५ रुपयांचे घासलेट कोण घेणार, असा सवालही त्यांनी केला. तर गॅसधारकांना नोंदणी केल्यानंतर सहा तासांत घरपोच सिलिंडर कंपनीकडून उपलब्ध करून दिलेले असताना साडेतीनशे रुपये खर्च करून कोणता ग्राहक लहान सिलिंडर खरेदी करेल, अशी विचारणा केली.अनामत रक्कम आगावू घेण्याची अटशासनाने लहान सिलिंडर विक्री करण्यासाठी रेशन दुकानदारांना प्राधान्य दिले असले तरी, त्यासाठी त्यांनीच जागेची सोय करावी, तसेच ज्या ग्राहकाला सिलिंडर हवे असेल त्याच्याकडून साडेबाराशे रुपये सिलिंडरची अनामत रक्कम आगावू घेण्याची अट टाकली आहे. हे सर्व पाहता रेशन दुकानदारांनी त्यास विरोध करून गावोगावी असलेल्या गॅस एजन्सीच दुकानदारांना चालविण्यास द्या, अशी मागणी केली.
६५ रुपयांचे घासलेट, साडेतीनशेचे सिलिंडर विका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 12:21 AM