नाशिक : जिल्ह्यात अद्यापही समाधानकारक पाऊस बरसला नसला तरी जुलैच्या उत्तरार्धात झालेला पाऊस आणि त्यानंतर सुरू झालेल्या रिमझिम पावसामुळे जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा ६५ टक्क्यांवर पोहचला आहे. गत वर्षीच्या तुलनेत साठा १२ टक्क्यांनी कमी असल्याने जिल्ह्याला अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.
हवामान खात्याने यंदा जिल्ह्यात जोरदार पर्जन्यवृष्टीची शक्यता वर्तविली असली तरी जिल्ह्यात अजूनही अपेक्षित पाऊस होऊ शकलेला नाही. धरणांच्या पाणीसाठ्यात झालेली वाढ समाधानकारक असतांना दुसरीकडे शेतकऱ्यांनाही पावसाची प्रतीक्षा लागली आहे. काही तालुक्यांमध्ये दमदार झालेल्या पावसामुळे धरणातील साठा झपाट्याने वाढण्यास मदत झाली आहे.
गंगापूर समूहाचा जलसाठा ८४ तर दारणा जलसमूहाचा साठा ८० टक्क्यांवर पोहचला आहे. तर गिरणा जलसमूहात ५२ टक्के जलसाठा आहे. जिल्ह्यातील धरणांत एकूण ६५ टक्के जलसाठा आहे. मात्र गतवर्षी या कालावधीत धरणामध्ये ७७ टक्के इतका साठा होता. धरणातील साठ्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार असला तरी शेती आणि उद्योगाचेदेखील आवर्तन असल्यामुळे त्याचेही नियोजन करावे लागणार आहे.गंगापूर धरणातील साठा ९१ टक्क्यांवर पोहचला असल्याने येथून कधीही पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात इतरत्र फारसा पाऊस नसला तरी धरण समूहातील पावसामुळे गंगापूर धरणाची पातळी वाढतच आहे. दरम्यान, हवामान खात्याने रविवारपासून पावासाचे पुनरागमन होणार असल्याचे संकेत दिल्याने गंगापूरमधून विसर्गलाही सुरुवात होण्याची शक्यता आहे.धरणनिहाय पाणीसाठा (टक्केवारीत)गंगापूर - ९१कश्यपी -६६गौतमी गोदावरी - ७३आळंदी - १००पालखेड - ८०करंजवण- ४०वाघाड - ७२ओझरखेड - ३१पुणेगाव -४९तिसगाव - १२दारणा - ९०भावली -१००मुकणे - ५८वालदेवी- १००कडवा - ९२नांदूरमध्यमेश्वर - ९८भोजापूर - २२चणकापूर - ८१हरणबारी - १००केळझर - ८५नागासाक्या - १९गिरणा - ४५पुनद -८८माणिकपुंज - १००