नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी अर्ज माघारी सुरू झाली असून, सोमवारी सहाही प्रभागांतून एकूण ६६ उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यात काही विद्यमान नगरसेवकांचा समावेश आहे. मंगळवारी माघारीचा अंतिम दिवस असून, यावेळी बंडखोरांनी माघार घ्यावी यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे अखेरच्या दिवशी माघारीचे राजकारण रंगण्याची चिन्हे आहेत.महापालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांमध्ये उत्साह होता. परंतु राजकीय पक्षांकडून अधिकृत उमेदवारांची यादी घोषित करण्यास विलंब झाल्याने अनेकांनी अर्ज दाखल केले होते. त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीत सुमारे दीड हजाराच्या आसपास उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. शुक्रवारी अर्ज दाखल झालेल्या अर्जांची छाननी शनिवारी करण्यात आली. त्यानंतर सोमवार आणि मंगळवार असे दोन दिवस माघारीसाठी असून, सोमवारी ६६ उमेदवारांनी माघार घेतली. नाशिक पश्चिम विभागातून चार उमेदवारांनी माघार घेतली, तर सिडको विभागातून ९ उमेदवारांनी माघारीचे अर्ज दिले. पूर्व विभागात ११ जणांनी माघार घेतली. त्यात १५ क मधून अर्चना थोरात यांचा समावेश आहे, तर पंचवटीतून एकूण १३ जणांनी माघार घेतली, त्यात नगरसेवक रूपाली गावंड तसेच जयश्री धनवटे यांचा समावेश आहे. सातपूर विभागात १२ जणांनी माघार घेतली असून, त्यात नगरसेवक लता पाटील यांचा समावेश आहे. नाशिकरोड विभागातून १७ जणांनी माघार घेतली आहे. मंगळवारी माघारीचा अखेरचा दिवस असून, यादिवशी माघारीसाठी झुंबड उडण्याची शक्यता आहे. सर्वच पक्षात कमी अधिक प्रमाणात बंडखोरी असल्याने बंडखोरांनी माघार घ्यावी यासाठी सोमवारपासूनच प्रयत्न सुरू झाले असून, साम दाम दंड भेद नितीचा अवलंब करण्यात येत आहे. अनेक उमेदवारांनी बंडखोरांच्या घरी जाऊन त्यांना राजी करण्याचे प्रयत्न केले. बऱ्याच राजकीय पक्षांनी प्रबळ बंडखोरांना चुचकारण्यासाठी विविध पदांची आमिषे दाखविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे अखेरच्या दिवशी राजकारण रंगण्याची चिन्हे आहेत.
पहिल्या दिवशी ६६ उमेदवारांची माघार
By admin | Published: February 07, 2017 1:02 AM