सिन्नर तालुक्यातील मुसळगाव येथील ६६ वर्षीय महिला अनुसया मनोहर शिरसाट यांना कोरोनाची लक्षणे दिसू लागल्याने त्यांना डॉक्टरांनी विविध कोविड तपासण्या करण्यास सांगितल्या. त्यावरून आजींना कोरोना लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर तपासणी अहवालावरून रुग्णाची परिस्थिती गंभीर असून तातडीने मोठ्या सुसज्ज रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला देण्यात आला. रुग्णाचे नातेवाईक घाबरून गेले. काय करावे त्यांना सुचेना. सिन्नर ग्रामीण रुग्णालयात गेल्यानंतर रुग्ण अत्यवस्थ असल्याचे लक्षात आले. रुग्णाचा स्कोअर २३, ऑक्सिजनची पातळी ७७, श्वास घेण्यास त्रास होत होता. धाप लागत होती. बेड उपलब्ध नसल्याने रात्री साडेआठ ते बारा पर्यंत आजींना बाकड्यावरच झोपून ठेवण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना नाशिकला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. रुग्णाला ऑक्सिजन, व्हेंटिलेटर व रेमडेसिविर इंजेक्शनची गरज लागणार होती. येथे काहीच उपलब्ध नव्हते. जिल्हा रुग्णालयातही जागा नसल्याचे समजल्याने रुग्णाचे घरचे व नातेवाईक हबकून गेले होते. सिन्नरसह नाशिक, एसएमबीटी, निफाड, संगमनेर, कोपरगाव येथे पण व्हेंटिलेटर व बेड मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. तथापि, कोठेच बेड मिळत नाही हे पाहून आजीच्या मुलांनी शेवटचा पर्याय म्हणून त्यांचे मित्र शिवकृपा मेडिकलचे संचालक व सिन्नर तालुका सोशल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष अतुल झळके यांच्याशी संपर्क साधून आपबीती कथन केली. ताबडतोब झळके आले त्यांनी पण बेडसाठी प्रयत्न केला पण निराशाच पदरात पडली. शेवटी त्यांनी नाशिकच्या ओळखीच्या डॉक्टरांशी संपर्क करून परिस्थिती सांगितली. डॉक्टरांनी दिलेली औषधे-गोळ्या मेडिकल उघडून रुग्णाला दिल्या. त्यांना सर्व परिस्थिती समजावून सांगून त्यांचे समुपदेशन केले. मानसिक आधार दिला. दुसऱ्या दिवसापासून आजीच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा होऊ लागली. त्यांची ऑक्सिजनची पातळी वाढू लागली, जेवणही चांगले जाऊ लागले. धापपण कमी झाली. आता आजीची तब्येत ठणठणीत आहे.
फोटो - ०३ अनुसया शिरसाठ
दोन वर्षांपूर्वी कर्करोगावर विजय मिळविलेल्या मुसळगाव येथील ६६ वर्षीय अनुसया शिरसाठ यांनी कोरोनावरही प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर मात केली.