वडनेर : मालेगाव तालुक्यातील सावतावाडी येथील वसंत पांडुरंग अहिरे यांच्यावर बुधवारी सकाळी पहाटेच्या सुमारास बिबट्याने हल्ला करून पाच शेळ्या, बोकड व एक शेळीचे पिलू अशी सात जनावरे फस्त केली. पाच शेळ्या अत्यंत जखमी अवस्थेत आहेत.
नेहमीप्रमाणे सकाळी अहिरे आपल्या घराजवळील शेळ्यांकडे गेले असता हा प्रकार निदर्शनास आला. घटनेची माहिती देत जखमी शेळ्यांवर उपचारासाठी पशुवैद्यकीय अधिकारी जाधव व शिंदे यांना पाचारण केले. वन विभागाच्या अधिकाऱ्यांना संबंधित घटना कळवली असता सकाळी दहा वाजता वडनेर वनपरिक्षेत्रातील वनरक्षक नंदिनी बच्छाव यानी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. अहिरे यांचे या बिबट्याचा हल्ल्यात एक ते दीड लाखांपर्यंत नुकसान झाले असून जखमी शेळ्या दगावल्यास नुकसान वाढण्याची शक्यता आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून सावतावाडीत बिबट्याचा मुक्तसंचार असून परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. परिसरात शेळीपालन, पशुपालन बरोबरच शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. शेत पिकांना पाणी देण्यासाठी रात्रीच्या वेळी जावे लागते. बिबट्याचा मुक्त संचारामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी सावतावाडी येथील वसंत अहिरे यांच्यासह परिसरातील नागरिकांनी मालेगाव वनविभागाला केली आहे.
गेल्या अनेक वर्षापासून अहिरे कुटुंब सावतावाडी - रावळगाव रस्त्यालगत वास्तव्यास असून शेती व्यवसाय करतात. कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविण्यासाठी शेळीपालन करतात. एकूण दहा ते बारा शेळी त्यांच्याकडे होत्या. त्यात ७ शेळ्या बिबट्याने ठार केल्या तर राहिलेल्या पाच ते सहा शेळ्यांवर बिबट्याने हल्ला चढवून जखमी केल्याने अहिरे यांचे उदरनिर्वाहाचे साधन हिरावल्याने कुटुंब आर्थिक संकटात सापडले आहे. शासनाकडून त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी अहिरे कुटुंबाने केली आहे.