नाशिक : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये नवमतदारांसाठी राबविलेल्या मतदार नोंदणी मोहिमेला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला असून, ७० हजारांहून अधिक मतदारांची नव्याने भर पडली आहे. आयोगाने दरवर्षाप्रमाणे सप्टेंबरपासून पुन्हा नियमित मतदार नोंदणीचा कार्यक्रमही घोषित केला आहे.या नवीन मतदार नोंदणीत नाशिक, मालेगाव, निफाड व चांदवड या चार तालुक्यांत सर्वाधिक नोंदणी करण्यात आली आहे. १ जूनपासून ही मोहीम सुरू करण्यात आली होती. सन २०११ मध्ये करण्यात आलेल्या जनगणनेनुसार जे नव मतदार जुलैमध्ये वयाची १८ वर्षे पूर्ण करतील त्यांची मतदार म्हणून नोंद करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवण्यात आले होते. नाशिक जिल्ह्यात अशा प्रकारची संख्या सुमारे दोन लाखांच्या आसपास असल्याने त्यादृष्टीने निवडणूक शाखेने नियोजन केले होते. त्यात प्रामुख्याने जून व जुलै महिन्यांत दहावी, बारावी उत्तीर्ण झालेल्या व पुढील शिक्षणासाठी महाविद्यालयात प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांना सक्तीने मतदार करून घेण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. त्यासाठी प्रत्येक महाविद्यालयाच्या प्राचार्यांना समन्वय म्हणून नेमण्यात आले होते व विद्यार्थ्यांकडून प्रवेश अर्ज घेतानाच मतदार नोंदणी अर्जही भरून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या याशिवाय नवमतदारांबरोबरच अन्य मतदारांनाही या नोंदणीत सहभागी होता यावे यासाठी निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार दोन दिवस विशेष मोहीमही मतदान केंद्रनिहाय राबविण्यात आली होती, परंतु जून व जुलै महिन्यांत अनेक महाविद्यालयांमध्ये शैक्षणिक प्रवेशाचा घोळ सुरू राहिल्याने मतदार नोंदणीत अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे पाहून निवडणूक आयोगाने आॅगस्टअखेरपर्यंत मुदत वाढवून दिली होती. ३१ आॅगस्टअखेर जिल्ह्णात ७० हजार ७३७ मतदारांची नोंदणी करण्यात आली असून, त्यात ३६,७६९ पुरुष व ३३,९६८ महिलांचा समावेश आहे. याशिवाय एकापेक्षा अधिक मतदारसंघात नाव असलेल्या ३४५० दुबार मतदारांनी नाव वगळण्यासाठी अर्ज सादर केले आहेत. नाव, पत्त्यात, लिंगात बदल असल्यास त्यात दुरुस्ती करणारे तसेच एका मतदारसंघातून दुसºया मतदारसंघात स्थलांतरित झालेल्या मतदारांचाही या माहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.
जिल्ह्यात ७० हजार नवमतदारांची नव्याने भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2017 12:48 AM