नाशिक : महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलच्या २५ सदस्यांच्या निवडीसाठी जिल्ह्यातील विविध न्यायालयांमध्ये बुधवारी (दि़ २८) मतदानप्रक्रिया किरकोळ अपवाद वगळता शांततेत पार पडली़ जिल्ह्यातील एकूण ४६१० वकील मतदारांपैकी ३२५० (७०़२८ टक्के) वकील मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला़ नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात मतदानासाठी वकिलांनी लावलेल्या रांगा व केवळ दोन मतदान केंद्रे यामुळे ओरड झाल्यानंतर दुपारी चार मतदान केंद्रे वाढविण्यात आली़ मतदानासाठी सुमारे अडीच तासांची प्रतीक्षा करावी लागत असल्याने प्रारंभी गोंधळ निर्माण झाला होता़ दरम्यान, निवडणुकीत उभ्या असलेल्या काही उमेदवारांच्या समर्थकांमध्ये किरकोळ शाब्दिक बाचाबाचीचे प्रकारही यावेळी घडले़ महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिल निवडणुक ीच्या मतदानासाठी जिल्हा सत्र न्यायालयासह तालुका न्यायालयांमध्ये १४ मतदान केंद्रे तयार करण्यात आली होती़ या निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या १६४ उमेदवारांमध्ये नाशिक जिल्ह्यातील आठ उमेदवारांचा समावेश आहे़ जिल्हा व सत्र न्यायालयात मतदानासाठी सकाळी ९ वाजेपासून वकील रांगेत उभे होते़ मात्र, ३०९२ मतदारांसाठी आयटी लायब्ररी व सहायक सरकारी वकिलांचे कार्यालय अशी दोनच मतदान केंद्रे असल्याने सुमारे अडीच तास एका मतदानासाठी लागत होते़ याबाबत उमेदवार व वकिलांनी ओरड केल्यानंतर प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या आदेशान्वये दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास मतदान केंद्रांची संख्या चारने वाढविण्यात आली़जिल्हा व सत्र न्यायालयात सकाळपासूनच निवडणुकीतील उमेदवार कौन्सिलचे माजी अध्यक्ष तथा राष्ट्रीय मसुदा समितीचे निमंत्रक अॅड़ जयंत जायभावे, माजी सदस्य अॅड़ अविनाश भिडे, नाशिक बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अॅड़ दिलीप वनारसे, आॅल इंडिया वुमेन लॉयर्स संघटनेच्या माजी अध्यक्ष अॅड. इंद्रायणी पटणी, नाशिक बार असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष अॅड़ बाळासाहेब आडके, अॅड़ विवेकानंद जगदाळे, अॅड़ लीलाधर जाधव, अॅड़ अनिल शालिग्राम हे वकील मतदारांना आपल्याला मतदान करावे यासाठी विनंती करीत होते़, तर मतदारांची नावे व अनुक्रम नंबर शोधण्यासाठी जिल्हा न्यायालयातील नवीन इमारतीत उमेदवारांचे समर्थक मदत करीत होते़महाराष्ट्र व गोवा या दोन्ही राज्यांतील एक लाख दहा हजार वकील मतदारांसाठी ३११ न्यायालयांमध्ये मतदानप्रक्रिया पार पडली़ या निवडणुकीतून महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे २५ सदस्य निवडले जाणार असून, त्यामधून अध्यक्ष, उपाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांची निवड केली जाणार आहे़ या निवडणुकीच्या प्रचारासाठी अखेरपर्यंत उमेदवारांकडून प्रत्यक्ष गाठीभेटींबरोबरच सोशल मीडियाचा (व्हॉट्सअॅप, फेसबुक) प्रचारासाठी प्रभावीपणे वापर करण्यात आला़ पोलीस बंदोबस्तात पार पडलेल्या या मतदानप्रक्रियेसाठी संपूर्ण जिल्हाभरात केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी व मदतनीस अशा ९० जणांची नेमणूक करण्यात आली होती़सुमारे दोन महिन्यांनंतर निकालमहाराष्ट्र व गोवा या दोन्ही राज्यांत बुधवारी पार पडलेल्या मतदानप्रक्रियेनंतर या सर्व ठिकाणच्या मतपेट्या मुंबई येथील महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलच्या मीटिंग हॉलमध्ये नेण्यात येणार आहेत़ या निवडणुकीची पद्धती ही पसंतीक्रम असल्याने पसंतीनंतर उमेदवारांची मते मोजली जातील़ ही सर्व प्रक्रिया किचकट असल्याने सुमारे दोन महिन्यांनंतर या निवडणुकीचा निकाल लागण्याची शक्यता आहे़