नाशिक: शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली जादा पैसे कमविण्याचे आमिष दाखवत दोघांना तब्बल ७० लाख ९४ हजार रुपयांना ऑनलाइन गंडा घातल्याचा प्रकार शहरात पुन्हा उघडकीस आला. मागील वीस दिवसात दुसरी मोठी फसवणूक या पद्धतीची झाली असून, कोट्यवधी रुपयांना गंडा घालण्यात आला आहे.
सायबर पोलिस ठाण्यात दोघा फिर्यादींनी धाव घेत इंटरनेटद्वारे ऑनलाइन फसवणूक झाल्याचे सांगितले. खोटी माहिती देऊन ब्रोकर म्हणून काम करण्याचे आमिष दाखविण्यात आले. यासाठी बनावट वेबसाइटचे काही पत्ते कळविण्यात येऊन शेअर ट्रेडिंग करण्यास भाग पाडण्यात आले. यासाठी जादा परतावा मिळत असल्याचे आमिष फिर्यादींना दाखविण्यात आले.
पहिल्या फिर्यादीची ५१ लाख ४६ हजार ५०० रुपयात, तर दुसऱ्या एका फिर्यादीची १९ लाख ४७ हजार ५०० रुपयांत फसवणूक करण्यात आली. संशयितांनी वेगवेगळ्या क्रमांकावरून व्हाॅटस्ॲपवर संपर्क साधला. विश्वास संपादन करण्यासाठी प्रारंभी गुंतवणुकीनंतर जादा परतावा मिळत असल्याचे भासविण्यात आले. त्यामुळे फिर्यादींनी विश्वास ठेवत वेगवेगळ्या पैशांची गुंतवणूक केली. मात्र, नंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादींनी सायबर पोलिस स्टेशन गाठले. त्यानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.