नाशिक : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत सुमारे ७२ टक्के इतके मतदान झाले असून, मतदारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंदिस्त झाले आहे. सकाळपासूनच मतदानासाठी मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. दुपारपर्यंत अनेक मतदान केंद्रांवर ४० टक्केपेक्षा अधिक मतदान झाले होते. विशेष म्हणजे महिला मतदारांची संख्या देखील लक्षणीय होती. बुधवारी (दि. २२) रोजी मतमोजणी होणार असून, प्रशासनाकडून तयारी पूर्ण करण्यात आली.
जिल्ह्यातील ३८ ग्रामपंचायतीतील ४९ जागांसाठी मंगळवारी ७१.७४ टक्के मतदान झाले. बागलाण ४, मालेगाव ३, नांदगाव ३, निफाड ५, इगतपुरी ६, दिंडोरी ३, नाशिक ३, येवला २, देवळा २, कळवण २, चांदवड २, त्र्यंबकेश्वर १, सिन्नर २ अशा एकूण ३८ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. निवडणूक शाखेकडून प्राप्त आकडेवारीनुसार ७१.७४ टक्के मतदान झाले असून, सर्व केंद्रांवर शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. एका केंद्राध्यक्षांसह ४ कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. यासाठी २०० कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती.
जिल्ह्यात २२९ ग्रामपंचायतींच्या ३९३ जागांची पोटनिवडणूक आयोगाने जाहीर केली होती. परंतु ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने १९ जागांची निवडणूक स्थगित करण्यात आली, त्यामुळे प्रत्यक्षात ३७३ जागांसाठी प्रक्रिया राबविण्यात आली; मात्र २०८ जागांसाठी एकही वैध उमेदवारी अर्जच प्राप्त झाला नसल्याने अशा ठिकाणी मतदान प्रक्रिया राबविण्यात आलेली नाही. यासोबतच १६६ ग्रामपंचायतींच्या तब्बल ११७ जागा बिनविरोध झाल्या. त्यामुळे ३८ ग्रामपंचायतींतील ४९ जागांसाठीच मंगळवारी मतदान झाले.