निफाड : निफाड विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी एकूण ७३.७१ टक्के मतदान झाले असून, १,८२,०८४ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. ९९,१८४ पुरुष, तर ८२,९०० स्त्री मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. निफाड शहरात सकाळी मतदानास प्रारंभ झाला तेव्हा मतदानाचा वेग कमी होता. नंतर मात्र मतदानासाठी मतदारांनी गर्दी केली. स्त्री-पुरुष यांच्याबरोबरच तरुण मतदारांनीही मतदानासाठी गर्दी केली होती. दुपारी १ वाजेपर्यंत या मतदारसंघात ३८.०९ टक्के मतदान होऊन ९४,३३२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. मतदारसंघात एकूण ८८ गावे असून, एकूण मतदार २,४७,०३२ आहेत. यापैकी एकूण १,८२,०८४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. निफाड येथे गरीब मतदार मतदानासाठी जास्तीत जास्त बाहेर पडलेला दिसला. मागीलपंचवार्षिक निवडणुकीत ६९.७५ टक्के मतदान होऊन १,६०,४२२ मतदारांनी हक्क बजावला.यावर्षी मतदान टक्केवारीत वाढ होऊन ती ७३.७१ टक्के झाली. मागील पंचवार्षिकच्या तुलनेत ३.९६ टक्के मतदानात वाढ होऊन या पंचवार्षिकला २१,६६२ इतक्या जास्त मतदारांनी मागच्या तुलनेत मतदान केले. निफाड तालुक्यात मतदान शांततेत पार पडले. पोलीस उपअधीक्षक देवराज यांच्या मार्गदर्शनाखाली निफाड मतदारसंघात कोणताही अनुचित प्रकार न घडून यादृष्टीने पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. (वार्ताहर)
निफाड शहरात ७३ टक्के मतदान
By admin | Published: October 15, 2014 11:28 PM