नाशिक : सीमेवर जखमी होणारे जवान, अपघातात जखमी होणारे तसेच कोविड रुग्णांसाठी रक्ताची मोठ्या प्रमाणात आवश्यकता भासते; परंतु सध्या रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून शिवसेनेने मुबलक रक्तसाठा उपलब्ध करून देण्याचा निर्धार केला असून, त्यासाठी विविध ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. याच माध्यमातून नाशिकरोड येथे घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात ७३ जणांनी रक्तदान केल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख आ. विजय करंजकर यांनी सांगितले.
मुक्तिधामजवळ दुर्गा उद्यानाशेजारी आयोजित रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी करंजकर बोलत होते. युवासेना पदाधिकारी आकाश गंगाधर उगले यांनी शिबिराचे आयोजन केले होते. नाशिकरोड विभागातून आरोग्य यंत्रणांसाठी मोठ्या प्रमाणात रक्तसाठा उपलब्ध करून देण्याचा निर्धार शिवसैनिकांनी केला आहे, असे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, उपनेते आणि माजी मंत्री बबनराव घोलप, माजी आमदार योगेश घोलप यांनी सांगितले.
आतापर्यंत झालेल्या १० शिबिरांत ६८५ पिशव्या रक्त संकलित करण्यात आले. या पंधरवड्यात होणाऱ्या ८ रक्तदान शिबिरांद्वारे आणखी ४१५ पिशव्या रक्त संकलित करून ११०० पिशव्या रक्त संकलित करण्याचे लक्ष्य आम्ही गाठणारच, अशी माहिती शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी दिली. युवासेना जिल्हाप्रमुख दीपक दातीर, राहुल ताजनपुरे, भारतीय विद्यार्थी सेना जिल्हा संघटक वैभव ठाकरे, युवासेना जिल्हा सरचिटणीस गणेश बर्वे आदींच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या शिबिरात संचित साळी, मयूर गाडेकर, राहुल राणे, तुषार जाचक, अमोल कोंबडे, रोहित दोताडे, आदित्य घेगडमल, यश रामचंदानी, वीरेश सपकाळे, सुमित राजपूत, ज्ञानेश्वर गायकवाड, राकेश गिते, तुषार जाचक, अभिजित जाचक, अजय जाचक, पवन शिंपल, कुलदीप यादव आदींसह ७३ रक्तदात्यांनी रक्तदान करून राष्ट्रकार्यात मोठे योगदान दिले.
यावेळी संजिवनी रक्तपेढीचे तंत्रज्ञ वीरेश सपकाळे, राकेश गिते, ज्ञानेश्वर गायकवाड, सुमित राजपूत यांचे विशेष सहकार्य लाभले.
इन्फो
बिटको रुग्णालयास व्हीलचेअर भेट
भारतीय विद्यार्थी सेना महानगरप्रमुख श्रीकांत मगर यांच्या वतीने दिवंगत भारतीय विद्यार्थी सेना पदाधिकारी शिवाजी कावळे यांच्या स्मरणार्थ बिटको रुग्णालयाला एक व्हीलचेआर व तीन वॉकर भेट देण्यात आले. शिबिराप्रसंगी शिवसेना पदाधिकारी श्याम खोले, नितीन चिडे, योगेश देशमुख, गंगाधर उगले, राजेंद्र वाकसरे, राहुल पाटील, किरण पाटील, गणेश गडाख, किरण डाहाळे, चंदू महानुभव, विकास गिते, योगेश शिंदे आदी उपस्थित होते.