नाशिक : महापालिकेमार्फत खासगी एजन्सीमार्फत सुरू असलेल्या मिळकत सर्वेक्षणात आतापर्यंत ७४ टक्के मिळकतींची मोजणी झाली असून, त्यात ५७ हजार ८८० नवीन मिळकती आढळून आल्या आहेत. दरम्यान, सर्वेक्षण कालावधीत शिल्लक २६ टक्के मिळकतींमध्ये काही मिळकती कायमस्वरूपी तर काही तात्पुरत्या स्वरूपात बंद आढळून आल्या असून, अनेकांनी मोजणीसाठी प्रवेश नाकारला होता. या सर्व मिळकतींना नोटिसा बजावण्याचे काम सुरू असून, परिणामस्वरूपी १५ हजार ३९५ मिळकतधारकांनी मोजणीस प्रतिसाद दिल्याची माहिती कर विभागातून देण्यात आली. महापालिकेकडून मिळकत सर्वेक्षणाचे काम नवी दिल्ली येथील जिओ इन्फोसिस टेक्नॉलॉजिक्स या कंपनीला देण्यात आले आहे. सदर कंपनीने १९ डिसेंबर २०१६ पासून प्रत्यक्ष सर्वेक्षणाला प्रारंभ केला. सध्या महापालिकेच्या दप्तरी मोकळ्या व बख्खळ जागांसह ४ लाख २४ हजार मिळकतींची नोंद आहे. त्यात ३ लाख ९४ हजार ७१६ मिळकती या बांधीव स्वरूपातील आहेत. सदर एजन्सीने २८ आॅगस्ट २०१७ पर्यंत सर्वेक्षणाचे काम पूर्णकेले असता त्यात ३ लाख ४८ हजार ३५४ मिळकतींची मोजणी झालेली आहे. सुमारे ७४ टक्के मिळकतींचा सर्व्हे पूर्ण करण्यात आला असता त्यात २ लाख ९० हजार ४७४ मिळकती या जुन्या व पूर्वीच्याच आहेत तर नवीन ५७ हजार ८८० मिळकतींची भर पडली आहे. उर्वरित २६ टक्के मिळकतींमध्ये अनेक मिळकती या कायमस्वरूपी बंद आढळून आल्या, तर काही तात्पुरत्या स्वरूपात बंद आढळून आल्या. अनेक ठिकाणी सर्वेक्षणासाठी नेमलेल्या पथकांना सोबत ओळखपत्र असूनही प्रवेश नाकारण्यात आला होता. महापालिकेने अशा मिळकतींची यादी करून त्यांना नोटिसा बजावण्याचे काम सुरू केले आहे. बंद घरांच्या दरवाजांवर नोटिसा बजावल्या जात असून, प्रवेश नाकारलेल्यांनाही इशारावजा नोटिसा दिल्या जात आहेत. परिणामस्वरूप गेल्या दोन महिन्यांत १५ हजार ३९५ मिळकतींची मोजणी होऊ शकली आहे. नोटिसांमुळे सर्वसाधारपणे प्रतिदिन सुमारे ५०० मिळकतधारकांची मोजणी केली जात आहे. त्याला नागरिकांकडूनही आता प्रतिसाद मिळू लागला आहे. दि. २४ आॅक्टोबर अखेर ३ लाख ६३ हजार ७४९ मिळकतींचा सर्व्हे पूर्ण झाला आहे. नवीन आढळून आलेल्या ५८ हजार मिळकतींची पुनर्तपासणी केली जाणार असून, त्यासाठी २५ कर्मचाºयांचे पथक नेमण्यात आले आहे. फेरसर्वेक्षणात खरी माहिती दडवून ठेवल्यास संबंधित मिळकतधारकांकडून सहा वर्षे मागे जाऊन त्यानुसार घरपट्टी आकारणी केली जाणार आहे.जुन्या मिळकतींची पुनर्तपासणीसर्वेक्षणात २ लाख ९० हजार ३७४ जुन्या मिळकती आढळून आल्या आहेत. या मिळकतींची मोजणी करण्यात आलेली आहे. मोजणीत वाढीव बांधकाम, वापरात बदल अथवा भाडेकरू ठेवल्याचे निदर्शनास आल्यास त्यानुसार घरपट्टीची आकारणी केली जाणार असून, विनापरवाना वाढीव बांधकामांबाबत नोटिसा बजावून कारवाई केली जाणार आहे. ज्याठिकाणी वापरात बदल असेल तेथे व्यावसायिक दराने आकारणी केली जाणार आहे. सद्यस्थितीत नवीन मिळकतींचे फेरसर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. त्यानंतर जुन्या मिळकतींकडे लक्ष केंद्रित केले जाणार असल्याची माहिती घरपट्टी विभागाकडून देण्यात आली.
७४ टक्के मिळकतींचा सर्व्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 12:12 AM