नाशिक : पेट्रोलियम कंपन्या आणि पेट्रेालपंपचालकांमधील इंधन वितरणावरून निर्माण झालेल्या वादामुळे सध्या जिल्ह्यातील इंधन वितरण विस्कळीत झाले आहे. गेल्या तीन दिवसांपासून नाशिककरांना पेट्रोल, डिझेलचा तुटवडा जाणवत असल्याने त्यांची धावपळ झाली आहे. जिल्ह्यात एकूण ७६ पेट्रोलपंपांवर इंधनाचा तुटवडा निर्माण झाला असून, त्यामध्ये सर्वाधिक ५५ पंप हे भारत पेट्रेालियमचे आहेत.
जिल्ह्यात इंधनाचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे अजूनही ७६ पेट्रोलपंप बंद असल्याने वाहनधारकांची गैरसेाय होत आहे. काही प्रमाणात परिस्थिती सुधारत असली तरी अजूनही पुरेशा प्रमाणात इंधन उपलब्ध होत नसल्याने पेट्रोलपंपांवर वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसत आहे. जिल्ह्यात भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम, इंडियन ऑइल कंपनी यांची एकूण ४६५ पंक असून, सद्यस्थितीत ३८९ पंपांवर इंधन उपलब्ध असल्याचा दावा करण्यात आला आहे.
जिल्ह्यात इंधनाचा तुटवडा निर्माण झाल्याने यावर चर्चा करण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसीकर गुरुवारी पंपचालक आणि पेट्रोल कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी दोघांनीही आपापले मुद्दे मांडले. सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय होऊ नये आणि इंधनाचे वितरण वाढविण्याच्या दृष्टीने सकारात्मक निर्णय घेण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. त्यामुळे पुढील तीन दिवसांत पुरवठा सुरळीत होऊ शकेल, असा विश्वास जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
-- कोट--
तीन दिवसात पुरवठा सुरळीत
इंधनाचा तुटवडा निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर वितरक आणि पेट्रालपंपचालकांशी चर्चा करण्यात आली आहे. जिल्ह्यात सध्या ८४ टक्के पंप सुरू असून, केवळ ४६ टक्के पंप बंद आहेत. वाहनधारकांनीही इंधनाचा साठा करू नये, येत्या तीन दिवसांत इंधनाचा पुरवठा सुरळीत करण्याच्या दृष्टीने संबंधितांना सूचना देण्यात आलेली आहे.
-अरविंद नरसीकर, जिल्हा पुरवठा अधिकारी