नाशिक : मागील वर्षी कोरोनामुळे लॉकडाऊन लागू करण्यात आलेला असल्याने साहजिकच नवीन जोडण्या कार्यान्वित करण्याचा वेग कमी झाला होता. असे असले तरी नवीन वीजजोडणी देण्यात खंड नसल्याने नाशिक परिमंडलात वर्षभरात ७८ हजार ५६१ नवीन जोडण्या करण्यात आल्या आहेत.
मागील वर्षी मार्च ते जूनपर्यंत कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे लॉकडाऊन असल्याने नवीन वीजजोडण्या कार्यान्वित करण्याचा वेग मंदावला होता. तरीही इतर वीजसेवांप्रमाणेच नवीन वीजजोडणी देण्याच्या कामात कोणताही खंड पडला नाही. मात्र एप्रिल २०२० ते मार्च २०२१ या कालावधीत कोकण प्रादेशिक विभागामध्ये २ लाख ८५ हजार ३३२ नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत. अहमदनगर मंडलामध्ये ३१ हजार ६९७, मालेगाव मंडलामध्ये ११ हजार ३८१ तर मालेगाव फ्रँचायझी क्षेत्रात ५ हजार ६० आणि नाशिक मंडलामध्ये ३० हजार ४२३ वीजजोडण्या याप्रमाणे एकूण नाशिक परिमंडलात ७८ हजार ५६१ वीजजोडण्या कार्यान्वित करण्यात आल्या आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला वीज मीटरचा तुटवडा कमी करण्यासाठी महावितरणकडून सिंगल फेजचे १८ लाख व थ्री फेजचे १ लाख ७० हजार नवीन वीज मीटरचा पुरवठा करण्याचे आदेश पुरवठादारांना याआधीच देण्यात आले आहेत. त्याप्रमाणे महावितरणच्या चारही प्रादेशिक कार्यालयांना मार्च अखेरपर्यंत ३ लाख ३५ हजार नवीन वीज मीटरचा पुरवठा करण्यात आला आहे. येत्या एप्रिल महिन्यातदेखील सुमारे साडेतीन लाखांवर नवीन वीज मीटर पुरविण्याचे नियोजन आहे. मीटरअभावी ग्राहकांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून उपलब्ध झालेले मीटर तातडीने संबंधित ग्राहकांकडे कार्यान्वित करण्याचे निर्देश मुख्य कार्यालयाकडून क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आले आहेत.
उच्च व लघुदाब वर्गवारीमध्ये घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, कृषी व इतर वर्गवारीतील वीजग्राहकांना एप्रिल २० ते मार्च २१ या कालावधीत कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक तसेच कृषी अशा सर्व वर्गवारीतील ग्राहकांना नवीन वीजजोडणीसाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. अर्ज केल्यापासून त्याची मंजुरीच्या प्रक्रियेतील स्थिती (ट्रॅक स्टेटस) पाहण्यासाठी वीजग्राहकांना ऑनलाइन सोय उपलब्ध आहे.