गेल्या दहा वर्षांपासून केंद्र सरकारकडून प्रत्येक नागरिकाला शुद्ध पिण्याचे पुरेसे पाणी मिळावे यासाठी राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गंत पाणीपुरवठ्याची सोय करण्यात येत होती. मोदी सरकारने याच योजनेचे नाव बदलून आता राष्ट्रीय जलजीवन मिशन नावाने २०२४ पर्यंत ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला नळाद्वारे पाणी पुरवठा करण्याचे ठरविले आहे. त्याची सुरुवात सन २०२० पासून झाली असून, त्यात यापूर्वी प्रत्येक नागरिकाला त्याच्या दिवसभराची पाण्याची गरज ४४ प्रति लीटर धरण्यात आली होती. आता नवीन योजनेनुसार त्याची मर्यादा १५ लीटरने वाढविण्यात आली असून, यापुढे प्रत्येकाला ५५ लीटर पाणी देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. त्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतींना घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्याच्या सूचना देऊन त्याची माहिती ऑनलाइन भरण्यात आलेली आहे. त्यात किती घरांना नळाद्वारे पाणीपुरवठा होतो व किती घरांना नळजोडणी नाही याची माहिती गोळा करण्यात आली आहे.
नाशिक जिल्ह्यातील १९२२ गावांमध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार १६१४ गावांमध्ये जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून तर ३०८ गावांमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत पाणीपुरवठा केला जातो. या गावांच्या सर्वेक्षणानुसार एक लाख, ९२ हजार ३९२ घरांमध्ये नळजोडणीद्वारे पाणीपुरवठा केला जातो तर पाच लाख, २१ लाख, ३८१ घरांमध्ये अद्यापही जोडणी नसल्याचे उघड झाले आहे. त्यानुसार गेल्या वर्षांपासून सुरू झालेल्या या योजनेत एका वर्षात दोन लाख, २४ हजार घरांना जोडणी देण्यात आली असून, ते काम पूर्ण झाल्याचा दावा केला जात आहे.
आगामी तीन वर्षांत चार लाख, ११ हजार ३२३ घरांना नळजोडणीचे काम पूर्ण करण्यात येणार असून, त्यासाठी ७८२ कोटी २९ लाख रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच जलजीवन मिशन योजनेंतर्गंत तयार करण्यात आलेल्या आराखड्यास पालकमंत्री छगन भुजबळ व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत या आराखड्यास मंजुरी देण्यात आली आहे.
=======
चौकट====
प्रत्येक घराला नळजोडणी व वाढीव पाणीपुरवठा करण्यासाठी सध्या कार्यरत असलेल्या पाणीपुरवठा योजनांची पुनर्बांधणी म्हणजेच जलकुंभांच्या क्षमतेत वाढ करण्याबरोबरच नवीन पाण्याचे स्रोत निर्माण करण्यावर भर देण्यात येणार आहे.
---------
तालुकानिहाय नळजोडणी व येणारा खर्च
* बागलाण- १६५ (८०.६८)
* चांदवड- ७७ (३४.८७)
* देवळा- ४९ (२७.६६)
* दिंडोरी- १५७ (५१.७३)
* इगतपुरी- ११६ (४७.८३)
* कळवण- १५१ (६३.०४)
* मालेगाव- ४९ (३६.३८)
* नांदगाव- ६० (१२.५९)
* नाशिक- ७५ (३९.९०)
* निफाड- ११९ (७४.९३)
* पेठ- १४५ (४२.९७)
* सिन्नर- ८९ (११५.९३)
* सुरगाणा- १९१ (९२.७०)
* त्र्यंबक- ८८ (४५.१२)
* येवला- ८३ (१५.९६)
---------
जिल्ह्यातील एकूण गावे- १९२२
नळजोडणी नसलेली घरे- ५,२१,३८१
तीन वर्षात द्यावयाची जोडणी- ४,११,३२३
येणारा एकूण खर्च- ७८२.२९
--------