अझहर शेख, नाशिक : शहरातील आडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका बांधकाम स्थळावर मजुरांमध्ये मिसळून सुमारे आठ इसम बांधकाम करत होते. याबाबतची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. नाशिक गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती शाखेच्या पोलिस अधिकारी, अंमलदारांनी वेशांतर करत याठिकाणी सापळा रचून आठ बांगलादेशींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून आधारकार्ड, पॅनकार्डसारखे भारतीय कागदपत्रांसह बांगलादेशाचे स्मार्टकार्डदेखील जप्त करण्यात आले आहे.
नाशिकच्या मालेगावमध्ये काही बांगलादेशींना जन्मदाखले दिल्याची घटना समोर आल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. राज्य सरकारकडून सर्वच जिल्ह्यांना याबाबत अलर्ट जारी करण्यात आला आहे. यानुसार नाशिक शहर पोलिसदेखील अलर्ट झाले असून ओळख लपवून शहरात कुठे मोलमजुरीची कामे करत बांगलादेशींचे वास्तव्य आहे का? याबाबत शोध घेण्याचे आदेश पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिले होते. या आदेशानुसार गुन्हे शाखेकडून तपास केला जात होता. दरम्यान, मध्यवर्ती गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरिक्षक प्रविण माळी यांना आडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका बांधकामस्थळावर काही संशयित इसम मजुर म्हणून काम करत असून ते बांगलादेशी असण्याची शक्यता असल्याची माहिती मिळाली होती. यानुसार त्यांनी वरिष्ठ पोलिस निरिक्षक डॉ. अंचल मुदगल यांना कळविले. त्यांनी गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक पोलिस आयुक्त संदीप मिटके यांना माहिती देऊन सुक्ष्म नियोजन केले. चार दिवस या बांधकाम स्थळावर पोलिसांनी वॉच ठेवून संशयितांना जाळ्यात घेतले. त्यांच्याविरूद्ध आडगाव पोलिस ठाण्यात परकीय नागरिक कायदा व बनावट कागदपत्रे बनवून त्याद्वारे फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अशी आहेत बांगलादेशींची नावे
सुमन कालाम गाझी (२७), अब्दुल्ला अलीम मंडल (३०), शाहीन मफिजुल मंडल (२३), लासेल नुरअली शंतर (२३), आसाद अर्शदअली मुल्ला (३०), आलीम सुआनखान मंडल (३२), अलअमीन आमीनुर शेख (२२), मोसीन मौफीजुल मुल्ला (२२) अशी पोलिसांनी अटक केलेल्या संशयित बांगलादेशी इसमांची नावे आहेत.