खंबाळे : सिन्नर तालुक्यातील खंबाळे येथील गोफणे वस्तीवर गेल्या आठ ते दहा दिवसात अज्ञात रोगाने १५० मेंढ्या तर ५० शेळ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गोफणे वस्तीवर अनेक शेतकरी मेंढी व शेळी पालन हा शेतीपूरक व्यवसाय करतात. गेल्या आठवड्यापासून परिसरात मेंढ्या व शेळ्यांना अज्ञात रोगाची लागण झाली आहे. मेंढी चारा खाणे बंद होते. नंतर पाय आणि खुर सुजणे, नाकातून लाल रंगाचे पाणी येते आणि लगेच मृत होतात. म्हाळू धोंडिबा गोफणे यांच्या ५३ मेंढ्या आणि ९ शेळ्या, नाना गोफणे याच्या ३२ मेंढ्या, खंडू गोफणे यांच्या १८, मीननाथ गोफणे यांच्या १३, सोमनाथ बोराडे यांच्या ३७ मेढ्यां मृत झाल्या आहेत. लहान कोकरांचा तर सर्वांचाच मृत्यू झाला आहे. या परिसरातील शेतकऱ्यांचे सुमारे ८ ते ९ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. दोडी येथील पशुसंवर्धन विभागाच्या डॉक्टरांनी उपचार सुरु केले आहेत. अद्याप रोगाचे निदान झाले नाही. गोफणे वस्तीवरील सर्व कुटुंबांचा उदरनिर्वाह हा शेळ्या, मेंढ्या पालनावर आहे. अचानक आलेल्या या रोगाने मोठी आर्थिक हानी झाली आहे. तरी शासनाने याकडे लक्ष देऊन पशुपालकांना आर्थिक मदत करावी अशी मागणी होत आहे. गेल्या आठ दहा दिवसापासून मृत झालेल्या शेळ्या-मेंढ्या इतरञ टाकल्याने दुर्गंधी पसरली आहे. मोकाट कुत्र्याचे टोळके येत आहे. तरी पशुसंवर्धन विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी पशुपालकांसह परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे
अज्ञात रोगाने १५० मेंढ्यांसह ५० शेळ्यांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 2:45 PM