ठळक मुद्देमनमाड : लोहमार्ग पोलिसांची कामगिरी
मनमाड : धावत्या रेल्वेतून ८ लाख २४ हजारांचे ऐवज चोरून नेणाऱ्या एका इसमास सीसीटीव्हीच्या आधारे मनमाड लोहमार्ग पोलिसांनी अवघ्या चार दिवसात अटक केली आहे. पोलिसांनी संशयितांकडून मुद्देमाल जप्त केला असून न्यायालयाने त्यास एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.दौंड - मनमाड लोहमार्ग वरून बेंगलोर ते नवी दिल्ली कर्नाटक एक्स्प्रेस बोगी क्रमांक एस-१२ मधून प्रवास करीत असताना सीटवर ठेवलेले कॅमेरा, लेन्स तसेच कागदपत्रे व रोख रक्कम असलेली शॉर्ट बॅग अज्ञात चोरट्याने कोपरगाव ते मनमाड रेल्वे स्थानक दरम्यान चोरून नेल्याची फिर्याद कलाधरण कलाकुमार पद्मकुमार(२४, रा. केरळ) यांनी दिली होती. या फिर्यादीवरून लोहमार्ग पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरूवात केली होती. सीसीटीव्हीच्या आधारे तपासादरम्यान रेल्वे स्थानकात संशयस्पद फिरणाऱ्या नितीन विश्वनाथ आहिरे ( वय ३०, रा. पानेवाडी) या इसमास ताब्यात घेतले. तपासादरम्यान नितीन आहिरे याच्याकडे शॉर्टबॅग, कॅनॉन कंपनीचा ६ लाख रुपये किमतीचा कॅमेरा, निकॉन कंपनीचा कॅमेरा तसेच निकॉर कंपनीची लेन्स आणि १७०० रुपये रोख असे एकूण ८,२४,१५० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. न्यायालयात त्यास हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली. लोहमार्ग पोलीस अधीक्षक औरंगाबाद मोक्षदा पाटील,उपविभागीय लोहमार्ग पोलीस उपविभागीय अधिकारी दीपक काजवे यांच्या मार्गदर्शनाखाली मनमाड लोहमार्ग पोलीस निरीक्षक शरद जोगदंड,उपनिरीक्षक राजेंद्र यलगुलवार यांच्यासह गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी संतोष भालेराव,महेंद्रसिंग पाटील रेल्वे सुरक्षा दलाचे मनिष कुमार यांनी ही कामगिरी केली.धावत्या रेल्वेतून ८ लाखांची चोरी ; मुद्देमालासह संशयितास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2021 1:17 AM