पंचवटी : बेरोजगार युवती तसेच युवकांना नाशिक महानगरपालिकेत नोकरीला लावून देण्याच्या बहाण्याने बनावट नियुक्तीपत्र देऊन सुमारे आठ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी नाशिक महानगरपालिकेच्या आस्थापना विभागातील सचिन जिभाऊ सूर्यवंशी या कर्मचाऱ्याविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पेठरोड परिसरात राहणाºया प्रमिला नामदेव बागुल या महिलेने तक्रार दाखल केली आहे. सदरच्या शिपायाने माजी आयुक्त अभिषेक कृष्ण यांच्या बनावट सह्या केल्या होत्या. त्याचप्रमाणे फसवणुकीचा आकडा वाढण्याची शक्यता असून, तो ५८ लाखांपर्यंत असण्याची शक्यता आहे.याबाबत माहिती अशी की, पेठरोड दत्तनगर परिसरात राहणाºया सूर्यवंशी हे बागुल यांच्या ओळखीचे असल्याने गेल्या सप्टेंबर २०१६ मध्ये सूर्यवंशी याने, मी महापालिकेत नोकरीला कामाला असून फिर्यादी तसेच तुमचे भाऊ व तुमची बहीण अशा तिघांनाही मनपात लिपिक, इलेक्ट्रीशियन तसेच शिपाई म्हणून कामाला लावून देतो असे सांगून कधी आॅनलाइन कधी रोख अशी जवळपास ८ लाख रुपयांची रोकड उकळली. त्यानंतर काही दिवसांनी बागुल यांना मनपाचे बनावट नियुक्तीपत्र दिले मात्र संशय आल्याने बागुल यांनी याबाबत मनपात खात्री केली असता सदरचे नियुक्तीपत्र बनावट असल्याचे उघड झाले. सदर कर्मचारी आस्थापना विभागातील असल्याचे स्पष्ट झाले. बागुल यांनी सूर्यवंशी यांची भेट घेऊन वारंवार पैसे परत करण्याची मागणी केली असता त्याने टाळाटाळ केली. नोकरीच्या बहाण्याने तक्रारदार बागुल, त्यांचा भाऊ अमित व बहीण सारिका यांची सुमारे आठ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे लक्षात येतात त्यांनी पंचवटी पोलिसांत धाव घेत झाल्या प्रकाराबाबत तक्रार दिल्याने सूर्यवंशी याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक कैलास वाघ तपास करीत आहेत.कर्मचा-याची चौकशीमहापालिकेत नोकरीला लावून देण्याच्या नावाखाली ८ लाख रुपयांची फसवणूक करणाºया संशयित मनपा कर्मचारी सचिन सूर्यवंशी याची मनपात चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. बागुल यांच्यापाठोपाठ सूर्यवंशी याने मनपात आस्थापना विभागात कामाला असल्याचा फायदा घेत परिसरातील अनेकांना नोकरीच्या आमिषाने लाखो रुपयांचा आर्थिक गंडा घातल्याची शक्यता वर्तविली जात असून, पोलीस त्यादृष्टीने तपास करत आहेत.सूर्यवंशी याला टायपिंगही येईना..महापालिकेत नोकरीच्या नावाने फसवणूक करण्याच्या प्रकरणात आरोपी असलेला सूर्यवंशी याच्या बरोबरच अनेक जण असावेत किंवा संबंधितांची साखळी असावी, असा पोलिसांना संशय आहे. सूर्यवंशी याला पोलिसांनी याबाबत विचारणा केल्यानंतर आपल्याबरोबर कोणी नसल्याचा दावा त्याने केला. परंतु किमान नियुक्तीपत्राचे टंकलेखन करण्यासाठी तरी त्याने कोणाची तरी मदत घेतली असण्याची शक्यता असल्याचा पोलिसांचा संशय होता. त्यामुळे पोलिसांनी त्याला टंकलेखन करण्यास सांगितले, परंतु त्याला ते करता आले नाही. त्यामुळे या प्रकरणात आणखी कोणीतरी साथीदार असण्याची शक्यता आहे.
नोकरीच्या आमिषाने ८ लाखांना गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 12:58 AM