नाशिक : राज्याचे कृषिमंत्री खरिपाची आढावा बैठक घेऊन परतीच्या प्रवासाला लागलेले असताना जिल्ह्यातील आठ तालुक्यात गुरुवारी (दि.५) दुपारनंतर पुन्हा अवकाळी पावसाने झोडपून काढले असून, त्यामुळे शेतकऱ्याचे होते नव्हते त्या पिकाचेही पुन्हा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे सध्या लग्नसराई जोरात असल्याने या विवाह समारंभांनाही त्याचा फटका सहन करावा लागला आहे. दरम्यान, गेल्या तीन ते चार दिवसांपासून हवामानातील बदल व अवकाळी पावसाचा इशारा असल्यामुळे महसूल विभागाने थांबविलेेले पीक पंचनामे शनिवारपासून पुन्हा सुरू करण्यात येणार असून, तशा सूचना कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी गुरुवारीच यंत्रणेला दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
गुरुवारी (दि.४) दुपारनंतर पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, निफाड, सिन्नर, येवला, नांदगाव, मालेगाव या तालुक्याला वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपून काढले. अचानक आलेल्या या पावसामुळे शेतीच्या मशागतीत गुंतलेल्या शेतकऱ्यांची दाणाफाण उडाली. त्याच बरोबर शेतातील खळ्यात काढून ठेवलेला कांदा भिजला. त्याच बरोबर भाजीपाला व काढणीला आलेल्या पिकाचेही नुकसान झाले. हवामान खात्याने अवकाळी पावसाची तीव्रता शुक्रवारी (दि.५) कमी होईल, असा अंदाज व्यक्त केल्याने दिवसभर काहीसे ढगाळ हवामान कायम राहिले मात्र कोठेही पाऊस पडल्याची नोंद झाली नाही.