नाशिक : जिल्हा महसूल खात्याला शासनाने ठरवून दिलेल्या विविध कर वसुलीचे ८० टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले असून, आगामी तीन आठवड्यांत शंभर टक्के वसुली होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. सन २०१६ - १७ या आर्थिक वर्षासाठी २०९ कोटी ४२ लाख रुपये इतके उद्दिष्ट शासनाने दिलेले आहे. त्यापैकी १६८ कोटी ७८ लाख रुपये मार्चच्या पहिल्या आठवड्यात जमा करण्यात आले आहेत. त्यात जमीन विषयक सर्व प्रकारच्या करांचा जसा समावेश आहे तसाच गौणखनिजाची वसुली व करमणूक करांचाही त्यात समावेश आहे. महसूल वसुलीसाठी सर्वच तहसील कार्यालयांना उद्दिष्ट देण्यात आल्यामुळे सध्या फक्त यंत्रणा वसुलीत गुंतलेली आहे. गेल्या वर्षी सिंहस्थ कुंभमेळ्याची कोट्यवधींची कामे झाल्याने गौणखनिजापोटी मोठ्या प्रमाणावर महसूल गोळा करण्यात आला होता, परंतु यंदा कामेच ठप्प झाल्याने कर वसुलीसाठी दमछाक होत आहे. (प्रतिनिधी)भाम धरणाचा लाभ
इगतपुरी तालुक्यात बांधण्यात येत असलेल्या भाम धरणासाठी वापरण्यात आलेल्या गौणखनिजाच्या रॉयल्टीपोटी महसूल खात्याला सुमारे ४२ कोटी रुपये मिळाले आहेत. २००७ मध्ये या धरणाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले होते, तथापि, काम पूर्ण होताना अंदाजपत्रकापेक्षा अधिक खर्च झाला, त्यासाठी वापरलेले गौणखनिजाच्या रॉयल्टीच्या रकमेतही कमालाची वाढ झाल्याने ती महसूल खात्याच्या पथ्थ्यावर पडली आहे.