नाशिक : जिल्ह्यातील कोरोना लसीकरणात बुधवारपर्यंत लक्ष्याच्या तुलनेत ८० टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली आहे. जिल्ह्यातील एकूण ३३,६२० उद्दिष्टापैकी २६,७५४ संख्येचे उद्दिष्ट गाठण्यात यंत्रणेला यश आले असून, लसीकरण केंद्रांच्या संख्येतदेखील सातत्याने वाढ करण्यात येत आहे.प्रारंभी, आठवडाभराच्या टप्प्यात कमी असलेल्या लसीकरणाला गत पंधरवड्यापासून वेग देण्यात आला असल्याने नाशिक जिल्ह्याच्या लसीकरणाच्या टक्केवारीत सुधारणा होत आहे, तसेच लसीकरण चळवळीला अधिक वेग देण्यासाठी गत दोन आठवड्यांत लसीकरण केंद्रांच्या संख्येतदेखील २३ ने वाढ करण्यात आली असल्याने या महिन्यापासून त्याला अधिक वेग मिळण्याची चिन्हे आहेत. लसीकरणामध्ये प्रारंभीच्या टप्प्यात नाशिक जिल्हा काहीसा पिछाडीवर पडला होता. पहिल्या दिवशी तर केवळ ५७ टक्के लसीकरणाचे लक्ष्य साध्य होऊ शकले. मात्र, राज्यात देण्यात येत असलेल्या कोरोना लसींच्या डोसमध्ये कुठेही फार मोठे दुष्परिणाम दिसून आलेले नाहीत, तसेच कोणत्याही कर्मचाऱ्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्याचीदेखील वेळ आली नाही. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांमध्येदेखील लसीबाबत शाश्वती निर्माण झाल्याने लसीकरणाची प्रक्रिया आता वेग पकडू लागली आहे. जिल्ह्यात प्रारंभीच्या टप्प्यात १३ रुग्णालयांमध्ये लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली होती. त्यावेळी जिल्ह्यातील लसीकरणामध्ये प्रत्येक केंद्रावर काही कर्मचाऱ्यांनी विविध कारणांनी नकार दिला होता. त्यानंतर लस घेण्यात धोका नसल्याचे लक्षात आल्याने आता कोरोना लसीकरणात जिल्ह्यात हळूहळू वेग येऊ लागला आहे. जिल्ह्यात प्रारंभी कमी असलेल्या लसीकरणाच्या प्रक्रियेत हळूहळू सकारात्मक वाढ होत असल्यानेच नाशिक जिल्ह्यातील लसीकरणाची टक्केवारी ८० वर पोहोचली आहे.इन्फोदुसरा डोस तीन दिवसांनीपहिल्या टप्प्यातील कर्मचाऱ्यांना लसीचा दुसरा डोस १४ फेब्रुवारीपासून देण्यात येणार आहे. त्यामुळे तो दुसरा डोस पूर्ण व्हायला जवळपास एक महिना म्हणजे १४ मार्चपर्यंतचा काळ जाणार आहे. मात्र, आता पोलिसांसह अन्य फ्रंटलाइन वर्कर्सचे लसीकरण करण्यासदेखील प्रारंभ झाला असल्याने आता अन्य फ्रंटलाइन वर्कर्सच्या लसीकरणालादेखील वेग मिळू शकणार आहे.इन्फोत्रासाच्या घटना अत्यल्पआतापर्यंत लसीकरण करण्यात आलेल्या व्यक्तींपैकी केवळ १४७ आरोग्य कर्मचाऱ्यांनाच काहीसा त्रास झाला. मात्र, त्याचे प्रमाणदेखील अत्यल्प असल्याने आता आरोग्य कर्मचाऱ्यांसह अन्य नागरिकांमधील लसीच्या भीतीचे प्रमाण संपुष्टात आले आहे. त्यामुळेदेखील आता लक्ष्यापैकी जवळपास शंभर टक्के कर्मचारी लस घेऊ लागले आहेत.
जिल्ह्यातील लसीकरण ८० टक्क्यांवर! चढता आलेख : लसीकरण केंद्रांच्या संख्येतदेखील सातत्याने वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 12:53 AM