नाशिक : ‘भय इथले संपत नाही...’ असे निफाड तालुक्यातील गोदाकाठबाबतही बोलले जात असले तरी बिबट्याच्या दहशतीने थरारणारा गोदाकाठ येत्या काही दिवसांतच शांत होण्यास मदत होणार आहे. कारण बिबट्या या वन्यप्राण्याचे जीवशास्त्र आता लोकांपर्यंत पोहचविले जात आहे; त्यामुळे सायखेडा ते थेट तारुखेडलेपर्यंत रहिवाशांमध्ये जागरूकता निर्माण होऊ लागली आहे. जनप्रबोधन करणारे कुठल्याही अन्य शहरांतून आलेले नाही, तर तेदेखील गोदाकाठावरील पुत्र असून, ‘बिबट्यादूत’च्या भूमिकेतून ते दारोदारी पोहचत आहे.गोदाकाठचे भय होतंय कमी...निफाड तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात जनावरे, माणसे जखमी होण्याच्या घटना सातत्याने जरी घडत असल्या तरी या घटनांचे प्रमाण आता कमी होण्यास मदत होत आहे. गोदाकाठवरील सायखेड्यापासून पुढे पंचक्रोशीतील विविध शाळा-महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी ६५ महाविद्यालयीन व १६ शालेय विद्यार्थी ‘बिबट्यादूत’ची भूमिका चोखपणे बजावताना दिसत आहे. प्रत्येक बांधावर जाऊन गावकºयांना ‘बिबट्यादूत’ बिबट्याविषयीची माहिती व त्याचे जीवशास्त्र पटवून देण्याचा प्रयत्न करत आहेत. पिंजरे लावून येथील समस्या कायमस्वरूपी सुटणार तर नाहीच; मात्र ती अधिक गंभीर होणार आहे, त्यामुळे नागरिकांमध्येच बिबट्याविषयीची जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने २०१७ साली नोव्हेंबर महिन्यात ‘जाणता वाघोबा’ हे अभियान नाशिक वनविभाग पूर्वच्या वतीने हाती घेण्यात आले. या अभियानाला स्थानिक लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. वर्षभरात या अभियानांतर्गत गोदाकाठावरील विविध शाळा-महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधत लक्ष केंद्रित करण्यात आले. या भागात मविप्र संस्थेच्या शाळा-महाविद्यालयांची संख्या अधिक आहे. या संस्थेकडूनही वनविभाग आणि वाइल्डलाइफ कॉन्झर्वेशन सोसायटीच्या स्वयंसेवकांना सहकार्य मिळाले. यामुळे या भागात ‘जाणता वाघोबा’ यशस्वी ठरल्याचे उपवनसंरक्षक डॉ. शिवाबाला. एस यांनी सांगितले.सहा महिन्यांनंतर निवडसुरुवातीचे सहा महिने विद्यार्थ्यांना संबंधित वन्यजीव संस्था, स्थानिक वनरक्षकांनी बिबट्याचे जीवशास्त्र समजावून देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. यानंतर विद्यार्थ्यांमधूनच ‘बिबट्यादूत’ निवडण्यात आले. या दूतांना बिबट्याविषयीचे समज-गैरसमज लक्षात आणून देणारी माहितीपुस्तिका, सचित्र महितीपत्रके, ओळखपत्र आदी जनजागृतीपर साहित्य पुरविण्यात आले. विद्यार्थ्यांनी आपापल्या भागात जाऊन जनप्रबोधनाला सुरुवात केली. प्रत्येक बिबट्यादूताने प्रारंभी किमान पाच कुटुंबांच्या घरी भेट दिली.