नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्यामुळे शासन आता प्राथमिक शाळा सुरू करण्याचा विचार करीत आहे. त्यामुळे शासनाने कोरोना लस घेण्यासाठी शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ५ सप्टेंबरपर्यंतची डेडलाईन दिली होती. ही डेडलाईन उलटूनही शहरातील जवळपास ८१८ शिक्षकांनी लसीचा अद्याप एकही डोस घेतलेला नाही. त्यामुळे शाळा सुरू झाल्यास मुलांना शाळेत पाठवायचे तरी कसे, असा प्रश्न पालकांसमोर निर्माण झाला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे शासनाने प्रथम आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यास परवानगी दिली असून, ग्रामीण भागात अपवादवगळता, ८० ते ९० टक्के शाळा, कनिष्ठ महाविद्यालये सुरू झाली आहेत. शाळा, महाविद्यालयांमध्ये रुजू होताना, शिक्षण विभागाने शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणीसह कोरोना लसीकरण बंधनकारक केले आहे. परंतु, शहरातील शेकडो शिक्षक, शिक्षकेतरांनी अद्याप कोरोना लसीकरण करून घेतलेले नाही. लसीकरणाबाबत शिक्षकांच्या मनातही काही गैरसमज पसरलेले असल्यामुळे अनेकांनी कोरोनाची लस
घेतली नाही. काहींनी वेळकाढूपणाचे धोरण स्वीकारले असून, काहींना मात्र प्रकृतीच्या कारणामुळे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करून घेता आलेले नाही. राज्य शासनाने शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोरोनाच्या दोन्ही लसींचे डोस घेण्याची सक्ती केली असतानाही ८१८ शिक्षकांकडून त्याकडे दुर्लक्ष होत आहे, तर ४ हजार ११९ शिक्षक व कर्मचाऱ्यांनी केवळ एक लस घेतली आहे.
पॉईंटर-
शहरातील शिक्षक - ८,३०६
शिक्षकेतर कर्मचारी-१,९७१
एकूण -१०,२७५
---
दोन्ही डोस घेतलेले
शिक्षक - ४,५८१
शिक्षकेतर-८२०
एकूण -५,४०८
------
एक डोस घेतलेले
शिक्षक - ३,१८२
शिक्षकेतर-९४०
एकूण -४,११९
-----------
एकही लस न घेतलेले
शिक्षक - ५९८
शिक्षकेतर - २२०
एकूण ८१८