नाशिक : महापालिकेप्रमाणेच वाढीव लोकसंख्येचा आधार घेत जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सदस्य संख्येत वाढ करण्याचा राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाला राज्यपालांनी मान्यता दिल्यानंतर शासन राजपत्र प्रसिद्ध झाले असून, त्यानुसार नाशिकजिल्हा परिषदेत ८४ सदस्यांना निवडून जाण्याची संधी मिळणार आहे. जिल्हा परिषद सदस्यांची संख्या वाढणार असल्याने, साहजिकच पंचायत समित्यांच्या सदस्यांच्याही २२ जागा वाढणार आहे. तीन महिन्यापूर्वी राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला होता. कोरोनामुळे २०२१ ची जनगणना न झाल्यामुळे लोकसंख्या वाढीची आकडेवारी नसली तरी, गेल्या १० वर्षात शहरी व ग्रामीण भागात लोकसंख्या वाढल्याने त्याप्रमाणात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोकप्रतिनिधींची संख्या वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. महापालिकेच्या सदस्यसंख्या वाढीला यापूर्वीच मान्यता देण्यात आली असून, त्याच धर्तीवर जिल्हा परिषदेचे सदस्य वाढविण्याचे ठरविण्यात आले होते व तसा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला होता. राज्यपालांची या निर्णयास मान्यता मिळावी, यासाठी राज्य सरकारने प्रस्ताव पाठविला हाेता. जिल्हा परिषद सदस्यांची संख्या वाढीसाठी साधारणत: ३५ ते ३८ हजार लोकसंख्येमागे एक सदस्य वाढीव असावा, असे सरकारचे मत होते. त्यानुसार नाशिक जिल्हा परिषदेच्या सदस्यांची संख्या आता ७३ वरून ८४ इतकी झाली असून, ११ सदस्यांची संख्या नवीन अधिसूचनेनुसार वाढणार आहे. जिल्हा परिषदेच्या ११ जागा वाढल्यामुळे पंचायत समितीच्या २२ जागा वाढणार आहेत. मात्र या वाढीव जागा कोणत्या तालुक्यात किती असतील, याबाबत अनभिज्ञता आहे. कारण गट व गणांची फेररचना अद्याप झालेली नसल्याने लोकसंख्येचा निकष गृहित धरून जागा वाढणार आहेत.
जिल्हा परिषदेत मिळणार ८४ सदस्यांना संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2022 2:00 AM
महापालिकेप्रमाणेच वाढीव लोकसंख्येचा आधार घेत जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सदस्य संख्येत वाढ करण्याचा राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाला राज्यपालांनी मान्यता दिल्यानंतर शासन राजपत्र प्रसिद्ध झाले असून, त्यानुसार नाशिक जिल्हा परिषदेत ८४ सदस्यांना निवडून जाण्याची संधी मिळणार आहे. जिल्हा परिषद सदस्यांची संख्या वाढणार असल्याने, साहजिकच पंचायत समित्यांच्या सदस्यांच्याही २२ जागा वाढणार आहे.
ठळक मुद्देअधिसूचना जारी : पंचायत समित्यांना वाढणार २२ जागा