नाशिक : महिलांच्या गळ्यातील सौभाग्यलंकार अर्थात मंगळसूत्र वा सोनसाखळी चोरीच्या गत नऊ महिन्यांच्या कालावधीत ८५ घटना घडल्या असून, महिन्याला किमान दहा घटना घडतात़ चोरट्यांनी सुमारे पन्नास लाखांचा ऐवज या चेनस्नॅचिंगद्वारे लुटून नेला असून, या चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंघल यांच्या मार्गदर्शनाखाली मास्टरप्लॅन तयार करण्यात आला आहे़ या चोरट्यांचा गुप्तपणे मार्ग काढला जाणार असून, लवकरच या प्रकारास आळा बसण्याची शक्यता आहे़जानेवारी ते सप्टेंबर २०१६ या नऊ महिन्यांच्या कालावधीत शहरात ८५ चेनस्नॅचिंगच्या घटना घडल्या आहेत़ एकट्या-दुकट्या जाणाऱ्या, मॉर्निंग वॉक करणाऱ्या वा सायंकाळी फिरण्यासाठी जाणाऱ्या महिलांना त्यातही वृद्ध महिलांना सोनसाखळी चोरटे लक्ष्य करीत असल्याचे या घटनांवरून दिसून येते़ यातील बहुतांशी घटना या दुचाकीवरून आलेल्या संशयितांनी केल्या असून, या चोरट्यांच्या बंदोबस्ताठी पोलीस आयुक्तांनी सखोल अभ्यास करून मास्टर प्लॅन तयार केला आहे़ या मास्टर प्लॅनमुळे नाशिककर महिलांची चेनस्रॅचरच्या विळख्यातून सुटका होईल, अशी आशा आहे़शहर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त दत्तात्रय कराळे, सहायक पोलीस आयुक्त सचिन गोरे यांनी यापूर्वीचे रेकॉर्डवरील चेनस्रॅचरच्या याद्या तयार केल्या असून, त्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे़ याबरोबरच केवळ शहर वा जिल्ह्यातीलच नव्हे तर परजिल्हा तसेच महाराष्ट्राला लागून असलेल्या जिल्ह्यांमधील गुन्हेगारांचीही माहिती घेण्यात आली आहे़ याबरोबरच महिलांनी घराबाहेर पडताना दागिन्यांचे प्रदर्शन होईल, अशा पद्धतीने घालू नये. दुर्दैवाने घटना घडल्यास संबंधित वाहनाचा क्रमांक टिपण्याच्या तसेच सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून काळजी घेण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने जनजागृतीही केली जात आहे़ (प्रतिनिधी)
नऊ महिन्यांत ८५ चेनस्नॅचिंगच्या घटना
By admin | Published: October 21, 2016 2:16 AM